26.9 C
Latur
Saturday, June 15, 2024
Homeलातूरनिवडणूक आयोगाच्या मतमोजणीविषयक निर्देशांचे सर्वांनी पालन करावे -जिल्हाधिकारी

निवडणूक आयोगाच्या मतमोजणीविषयक निर्देशांचे सर्वांनी पालन करावे -जिल्हाधिकारी

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात सर्वांच्या सहकार्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्याचप्रमाणे ४ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष प्रतिनिधी आदी सर्वांनीच भारत निवडणूक आयोगाने मतमोजणीविषयी दिलेल्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. मतमोजणी प्रक्रिया आणि पूर्वतयारीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांना मतमोजणीसाठी करण्यात आलेली तयारी आणि टपाली मतदान, सैनिकांचे मतदान आणि ईव्हीएमवरील मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. तसेच सर्वांना मतमोजणी प्रतिनिधींसाठीच्या निर्देश पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आतापर्यंतची प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा मतमोजणीचा टप्पा ४ जून रोजी पार पडणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियेत उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांचीही महत्वाची भूमिका असणार आहे.  सर्व उमेदवारांनी आपल्या मतमोजणी प्रतिनिधींची नावे लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावीत. तसेच या प्रतिनिधींना मतमोजणी विषयक प्रशिक्षण  देण्यात यावे. तसेच कोणालाही भ्रमणध्वनी घेवून मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नसल्याने कोणीही आपले भ्रमणध्वनी सोबत आणू नयेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाने दोन निरीक्षकांची नियुक्ती केल्याचे सांगितले.
लातूर येथील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन येथे ४ जून  रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी १० टेबल लावण्यात येणार आहेत. तसेच मतदान यंत्रावरील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय सहा मतमोजणी कक्ष करण्यात आले असून प्रत्येक कक्षात १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.  तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय ५ व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी सांगितले. तसेच उमेदवारांनी मतमोजणी प्रतिनिधी नियुक्तीबाबत करावयाच्या कार्यवाहीची विस्तृत माहिती दिली आणि यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निरसन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR