नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नीट संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नीट परीक्षा रद्द करून जुनी प्रणाली लागू करावी अशी मागणी केली आहे. जुन्या पद्धतीनुसार, राज्य सरकारांद्वारे नीट परीक्षा घेतली जात होती. तीच पध्दत पुन्हा लागू करावी असे ममतांनी म्हटले आहे.
नीट परीक्षेचे पेपर फुटणे, परीक्षा आयोजित करणा-या अधिका-यांकडून लाच घेणे, विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणे आदी गंभीर आरोप केले जात आहेत. या आरोपांकडे तातडीने लक्ष देण्याची आणि सखोल चौकशीची गरज आहे. या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत आहे. अशा घटनांमुळे देशातील वैद्यकीय चाचण्यांच्या गुणवत्तेशी तडजोड तर होतेच शिवाय देशातील आरोग्य सेवेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो, असेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
‘नीट’ची जुनी प्रणाली लागू करावी
दरम्यान, २०१७ पूर्वी, राज्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी त्यांच्या स्वत:च्या प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी होती. शिवाय केंद्र सरकारकडूनही प्रवेश परीक्षा घेतली जात होती. ही यंत्रणा सुरळीतपणे काम करत होती. राज्य सरकार प्रत्येक डॉक्टरवर सुमारे ५० लाख रुपये खर्च करते, अशा परिस्थितीत स्वत: राज्य सरकारने वैद्यकीय विद्यार्थी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, असा दावाही ममता बॅनर्जींनी केला.