22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीयनो समेट, नो क्रिकेट!

नो समेट, नो क्रिकेट!

रशिया आणि युक्रेन दरम्यानचा प्रश्न युद्धभूमीवर सुटू शकणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन दौ-यात अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर ९ जुलै रोजी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. क्रेमलिनमध्ये भारत-रशिया शिखर परिषदेला सुरुवात करताना मोदी यांनी युक्रेन युद्धावरून भारताची भूमिका स्पष्ट केली. बॉम्ब, बंदुका आणि बुलेट यामध्ये शांतता चर्चा यशस्वी होत नाहीत असे ते यावेळी म्हणाले. नवीन पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शांतता सर्वांत महत्त्वाची आहे. युद्धभूमीवर प्रश्न सुटणे शक्य नाही. प्राणहानी झाल्यास मानवतेवर विश्वास ठेवणा-या प्रत्येकाला वेदना होतात. त्यातही निष्पाप मुलांची हत्या होणे हृदय पिळवटून टाकणारे आणि अतिशय वेदनादायी असते असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. परंतु अत्यंत निगरगट्ट, असंवेदनशील बनलेल्या तसेच कान बंद करून डोळ्यावर झापडे ओढलेल्या रशियाच्या ते लक्षात येत नाही. याबाबतीत रशिया आणि पाकिस्तान एकाच माळेचे मणी आहेत असे म्हणावे लागेल. आर्थिकदृष्ट्या पूर्णत: कंगाल बनलेला पाकिस्तान भारताबरोबर सलोख्याचे संबंध ठेवू इच्छित नाही. त्याचे बलाढ्य भारताच्या कुरापती काढणे सुरूच असते. भारतीय सीमेवर घुसखोरी करणे, अधूनमधून गोळीबार करणे,

दहशतवादाला प्रोत्साहन देणे, दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवणे असे प्रकार सुरूच असतात. ८ जुलै रोजी जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले तर अन्य सहा जखमी झाले. हे जवान मचेडी या दुर्गम भागात वाहनातून नियमित गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला आणि गोळीबार केला. भारतीय जवानांनी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले पण दहशतवादी जंगलात पळून गेले. कथुआ जिल्ह्यात गत चार आठवड्यांतील हा चौथा मोठा हल्ला होता. २६ जूनला दोडा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली होती. ९ जूनला रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला होता. त्यावेळी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून चालक-वाहकासह नऊ जणांचा मृत्यू झाला होता. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तानने त्या भागात अतिरेकी कारवायांना सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळत असल्याने त्यांना हल्ले करणे सोपे झाले आहे. कथुआ भागात अतिरेक्यांनी जो हल्ला केला तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता, त्याचा पुरेपूर बदला घेतला जाईल असा इशारा भारताने पाकला दिला आहे.

तीन ते चार युद्धात खरपूस मार मिळूनही पाकचे डोके ठिकाणावर येत नाही. सध्या पाकिस्तानात बंडाळी माजलेली आहे, महागाई गगनाला भिडली आहे. वेगळ्या बलुचिस्तानची मागणी होत आहे. पाकिस्तान आज आर्थिक दिवाळखोरीत भरडला जातोय त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारताने पाकबरोबरचे आर्थिक संबंध संपुष्टात आणले आहेत. अनेक प्रकारचे व्यापारी व्यवहारही थांबवले आहेत. दीड दशकापासून दोन्ही देशांदरम्यानची क्रिकेट मालिका ठप्प आहे. भारतीय संघ २००८ मधील आशिया चषकानंतर पाकिस्तानात खेळलेला नाही. उभय संघांत अखेरची द्विपक्षीय मालिका डिसेंबर २०१२-जानेवारी २०१३ दरम्यान खेळवण्यात आली होती. सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि दोन्ही देशांदरम्यानचे कटू राजकीय संबंध लक्षात घेता दोन्ही देशांचे क्रिकेट संघ आयसीसी स्पर्धांत एकमेकाविरुद्ध खेळतात. सहा महिन्यांपूर्वी भारतात पार पडलेल्या वनडे विश्वकप स्पर्धेत पाक संघाने सहभाग घेतला होता. परंतु भारताने मात्र पाकिस्तानात खेळण्यास कायम नकार दिला आहे.

आयसीसीने चॅम्पियन्स चषक २०२५चे यजमानपद पाकिस्तानला बहाल केले आहे. मात्र बीसीसीआय खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नाही. कसेही करून भारतीय संघ पाकिस्तानात यावा अशी पाकिस्तान क्रिकेट मंडळाची इच्छा आहे. भारताचा कायम नकार राहिल्यास पीसीबीचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाची साथ सोडणार नाही तोपर्यंत त्यांची अशीच ससेहोलपट होत राहणार यात शंका नाही. २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात ५ पोलिस शहीद झाले होते आणि श्रीलंकेचे ६ खेळाडू जखमी झाले होते. या घटनेनंतर केवळ इंग्लंड आणि न्यूझिलंड संघाने पाकचा दौरा केला आहे. दोन्ही संघांनी आपल्या मुख्य संघाऐवजी ‘ब’ दर्जाचे संघ पाठवले होते. पाकचा एकूण इतिहास पाहता क्रिकेटच्या माध्यमातून पाकिस्तानबरोबर प्रेम दाखवण्याची काहीच गरज नाही. कारण पाकला मैत्री अथवा सहकार्याची कोणतीच भाषा समजत नाही.

पाकबरोबर क्रिकेटच काय पण इतर कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणे धोक्याचे आहे. खेळाच्या माध्यमातून पाक वठणीवर येईल, शहाणा होईल असे नाही, त्यांची अवस्था कुत्र्याच्या शेपटासारखी आहे. पाकने अजूनही दहशतवाद थांबवलेला नाही. पाकद्वारा काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना मदत केली जाते. म्हणजे एकीकडे भारताबरोबर संबंध सुधारण्याची भाषा करायची, सांस्कृतिक-राजकीय संबंध निर्माण करण्याची इच्छा दर्शवायची आणि दुसरीकडे दहशतवादाला खतपाणी घालत राहायचे. पाकची ही प्रवृत्ती ठेचून काढायलाच हवी. दहशतवादाचा पुरस्कार करणा-या पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत हाच जालीम उपाय ठरू शकतो. भारताबरोबर कायम शत्रुत्वाची भावना जोपासणा-या पाकिस्तानला आपले हित कशात आहे हे जेव्हा लक्षात येईल तो सुदिन! तोपर्यंत नो समेट-समझोता, नो क्रिकेट!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR