नवी दिल्ली : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयातील दुस-या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती खन्ना यांना पुढील सरन्यायाधीश बनवण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास न्यायमूर्ती खन्ना १० नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती चंद्रचूड त्याच दिवशी निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ २३ मे २०२५ पर्यंत असेल. सुमारे साडेसहा महिने ते या पदावर राहणार आहेत.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला. त्यांचे वडील न्यायमूर्ती देव राज खन्ना हे देखील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यांची आई सरोज खन्ना या एलएसआर डीयूमध्ये लेक्चरर होत्या. येथूनच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. १९८० मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. यानंतर डीयूमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.
कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९८३ मध्ये बार कॉन्सिल ऑफ दिल्लीमध्ये वकील म्हणून काम सुरू केले. २००५ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २००६ मध्ये स्थायी न्यायाधीश करण्यात आले. २००६ ते २०१९ या कालावधीत उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.