बीड : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या. या पोस्टमध्ये भावनिक पोस्टसोबतच आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल झाली होती. या आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव निर्माण झाला होता. यानंतर वंजारी समाज आक्रमक झाला असून सुरुवातीला पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर शिरुर आणि परळी शहरसुद्धा बंद करण्यात आले होते आणि आज वडवणी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्यानंतर केंद्रात तिस-यांदा मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र, बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या, तर बजरंग सोनावणे विजयी झाले.
पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यातीलच एका आक्षेपार्ह पोस्टवरुन मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, आक्षेपार् पोस्टवरुन निर्माण झालेल्या वादाचे परिणाम काही केल्या थांबायला तयार नाहीत.