पटियाला : पंजाबच्या पटियालामधील छत्तरनगर गावात जमिनीच्या वादातून आज सकाळी दोन गटांमध्ये रक्तरंजित हाणामारी झाली, ज्यात पिता-पुत्रासह तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. घन्नौरचे डीएसपी बुटा सिंह यांनी सांगितले की, ही घटना सकाळी ८.३० ते ९.४५ च्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० एकर जमिनीच्या वादातून दोन्ही बाजूंनी गोळ्या झाडण्यात आल्या आणि धारदार शस्त्रांनी हल्लेही करण्यात आले. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. तर जखमींवर राजिंद्र रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दिलबाग सिंग आणि त्याचा मुलगा जसविंदर सिंग, सतविंदर सिंग यांचा समावेश आहे. तर हरप्रीत सिंग आणि हरजिंदर सिंग हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छतरनगर गावात ३० एकर कराराच्या जमिनीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होता. आज सकाळी दिलबाग सिंग आणि त्यांचा मुलगा जसविंदर सिंग हे करारावर घेतलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी छत्तरनगर गावात पोहोचले तेव्हा दुस-या पक्षातील सतविंदर सिंग, हरजिंदर सिंग आणि हरप्रीत सिंग तिथे आधीच उपस्थित होते. यावेळी दोन्ही गटात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यात दिलबाग सिंग आणि त्यांची मुले जसविंदर सिंग आणि सतविंदर सिंग यांचा मृत्यू झाला.