22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रपंढरीत मंदिर समितीला यंदा ८ कोटी ३४ लाखांचे उत्पन्न

पंढरीत मंदिर समितीला यंदा ८ कोटी ३४ लाखांचे उत्पन्न

पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरीत यंदा दि. १७ जुलै रोजी आषाढी यात्रा विठुनामाच्या गजरात मोठ्या भक्तिभावात पार पडली. आषाढी एकादशीनिमित्त वारक-यांनी प्रचंड गर्दी केली होती. ६ ते २१ जुलै असा यात्रेचा कालावधी होती. त्यामुळे या दरम्यान १० लाख ८८ हजार ५२७ भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. या यात्रेत मंदिर समितीला ८ कोटी ३४ लाखांचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत २ कोटींनी वाढल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

आषाढी एकादशी दिवशी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या दिवशी वारक-यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. लाखो वारक-यांनी विठुरायाचा जयघोष करीत पदस्पर्श दर्शन आणि मुखदर्शन घेतले. जवळपास ४ लाख ८३ हजार ५२३ भाविकांनी पदस्पर्श दर्शन आणि ६ लाख ५००४ भाविकांनी मुखदर्शन असे एकूण १० लाख ८८ हजार ५२७ भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावर्षी आषाढीला मोठी गर्दी झाल्याने पंढरपूर ओव्हरपॅक झाले होते. विविध वाहने, पायी पालखीसोबत लाखो भाविक पंढरीत दाखल झाले होते. यामुळे देवाच्या तिजोरीत यंदा गतवर्षीच्या तुलनेत २ कोटी रुपये जास्त जमा झाले.

आषाढी यात्रेसाठी यंदा १५ जुलै ते २१ जुलैदरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या ६ विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. वारक-यांच्या सोयीसाठी ५ हजार बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच विशेष गाड्या सोडल्या होत्या. ५ हजार बसेसद्वारे १९ हजार १८६ फे-यांमधून ९ लाख ५३ हजार भाविकांनी सुरक्षित प्रवास केला. यातून २८ कोटी ९२ लाखांचे एसटीला उत्पन्न मिळाले आहे. तत्पूर्वी वाखरीच्या रिंगण सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.

असे जमा झाले दान
यात्रा काळात श्रींच्या चरणाजवळ रू. ७७ लाख ०६ हजार ६९४ (मागील वर्षी (रू.५७, ९२३८३), भक्तनिवास रू. ५०,६०४३७ (मागील वर्षी रु. ४३८५५४७), देणगी रू. ३,८२,२६,८२८ (मागील वर्षी रू. ४,११,६१,५१२), लाडूप्रसाद रू. ९८,५३००० (मागील वर्षी रू. ७४,८०२८०), पूजा रू. ३९९२०९ (मागील वर्षी रू. ११९६१४), सोने भेट रू. १७, ८८,३७३ (मागील वर्षी रू. १३३२४७५), चांदी भेट रू. २,०३,६५२२८ (मागील वर्षी रू. १७३३७९१) व इतर रू. ३,६४००० (मागील वर्षी रू. ४६९०३०) असे एकूण ८ कोटी ३४ लाख, ८४ हजार १७४ रुपये (मागील वर्षी रू. ६ कोटी २७ लाख, ५४ हजार २२७) असे दान जमा झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR