26.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदी, राहुल गांधींच्या आज सभा

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींच्या आज सभा

प्रचाराची रणधुमाळी, राहुल गांधी चिखली, गोंदियात, मोदी पुणे, सोलापुरात

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला असून, राज्यातील नेत्यांसोबत राष्ट्रीय नेतेही राज्यात दौरे करून विविध ठिकाणी आपापल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यात तळ ठोकून आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही राज्यात दौरे करून प्रचाराचा धडाका लावत आहेत. यासोबतच कॉंग्रेसचे नेतेही राज्यात दाखल होत असून, प्रचारात सहभागी होत आहेत.

आता मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे आणि सोलापुरात सभा होत आहेत, तर कॉंग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विदर्भात चिखली आणि गोंदियात सभा होणार आहे. त्यामुळे उद्या टीकेची झोड पाहायला मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचाराचा धडाका लावला असून, त्यांनी विदर्भातून आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही सभा घेतल्या. आता मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पुणे आणि सोलापूरमध्ये त्यांच्या प्रचारसभा होत आहेत. त्यामुळे या निमित्ताने महाविकास आघाडीवर ते बल्लाबोल करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी उद्या काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात अनेक सभा घेतल्या. परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. परंतु आता विधानसभेत त्यांचा कितपत परिणाम होईल, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर येत असून उद्या ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी आणि गोंदिंया येथे काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यासाठी दोन प्रचारसभा घेणार आहेत. यासोबतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभाही राज्याच्या विविध भागात आयोजित करण्यात आल्या आहेत. याआधी ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन नागपूर येथे संविधान संमेलनाला संबोधित केले होते व त्यानंतर संध्याकाळी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रचारसभेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या ५ गॅरंटी जाहीर केल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर येथून चिखलीला जाणार
मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन होईल. तिथून ते हेलिकॉप्टरने चिखली येथे पोहोचतील. दुपारी १२ वाजता ते सभेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी ते गोंदिया येथे प्रचारसभेला संबोधित करतील व संध्याकाळी ४.५० वाजता गोंदियाहून दिल्लीकडे प्रयाण करतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR