शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकोळ येथे तीन वर्षांपूर्वी माहेराहून दुकानासाठी २ लाख रूपये घेऊन यावेत, अशी मागणी करीत पत्नीचा गळा दाबून खुन करणा-या आरोपी पतीस निलंगा न्यायालयाने दहा वर्षांची सक्तमजुरी तसेच पंधरा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील साकोळ येथील आकाश विनोद भुजंगा याने तीन वर्षापूर्वी पत्नी शुभांगी हीस माहेरहून दुकानासाठी दोन लाख रूपये घेऊन यावेत अशा प्रकारची मागणी करत गळा दाबून खुन केल्याची घटना घडली होती.याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीसात कलम ३०४ ब तसेच ४९८ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याचा तपास शिरूर अनंतपाळ येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केला असून त्यांनी तपासात सबळ पुरावा गोळा करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.तीन वर्ष निलंगा न्यायालयात या गुन्ह्याचा खटला सुरू होता तर पैरवी अधिकारी म्हणून शौकत बेग व कोंम्पले यांनी काम पाहिले. या प्रकरणातील सर्व साक्षी पुराव्याची तपासणी करून तीन वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. न्यायमूर्ती पी एम नागलकर यानी आरोपी पती आकाश विनोद भुजंगा यास दहा वर्षाची सक्त मजुरी तसेच कलम ३०४ ब अंतर्गत दहा हजार रूपये तर कलम ४९८ अ अंतर्गत ५ हजार अशा एकंदर पंधरा हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणुन एल. यू. कुलकर्णी यानी काम पाहिले