पुणे : प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर कात्रीने वार करून खून केला. पत्नीच्या हत्येचा व्हीडीओ पतीने बनवला. नंतर आरोपी पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. ही धक्कादायक घटना पुण्यातील खराडी भागात असलेल्या तुळजाभवानीनगर येथे बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ज्योती शिवदास गिते (वय २८), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शिवदास तुकाराम गिते (वय, ३७) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील रहिवासी आहे. तो न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतो. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद व्हायचे. बुधवारी पहाटे पत्नी ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. यावेळी त्यांचा सहा वर्षांचा मुलगाही तिथे होता.
ज्योतीचा आरडाओरडा ऐकून गाढ झोपेत असलेले शेजारी जागे झाले. शेजा-यांनी पाहिले असता ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.
उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती स्वत: खराडी पोलिस ठाण्यात हजर झाला. याचा
व्हीडीओही शिवदासने बनवला होता.
याबाबत माध्यमांशी बोलताना पोलिस अधिका-याने सांगितले, आरोपी शिवदास तुकाराम गिते याने कौटुंबिक आणि चारित्र्याच्या संशयावरून कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केला आहे. सदर प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.