पुणे : प्रतिनिधी
सतीश वाघ हत्या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. ९ डिसेंबर रोजी त्यांचे अगोदर अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर एकूण ७० वार करून त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे अक्षय जावळकर तसेच सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांचा काटा काढल्याचे समोर आले आहे.
सतीश वाघ हत्या प्रकरणातील अक्षय जावळकर या आरोपीचे वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिच्याशी अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने वाघ यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अक्षय जावळकर हा वाघ कुटुंबीयांच्या घरात भाड्याने राहात होता असे समोर आले.
अक्षय जावळकर याचे कुटुंबीय वाघ कुटुंबाच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याने राहण्यासाठी आले होते. त्यावेळी अक्षय जावळकरचे वय फक्त ९ वर्षे होते. सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांचा मुलगादेखील अक्षय जावळकरच्याच वयाचा होता. पुढे अक्षय जावळकर आणि वाघ दाम्पत्याच्या मुलाची मैत्री झाली. म्हणजेच अक्षय जावळकर ९ वर्षांचा असल्यापासून त्याचे वाघ दाम्पत्याशी जवळचे संबंध होते.
कित्येक वर्षांपासून होते अनैतिक संबंध
त्यानंतर अक्षय जावळकर २०१३ मध्ये २१ वर्षांचा झाला. तेव्हापासून अक्षय आणि मोहिनी वाघ यांची जवळीक वाढली. तेव्हापासून या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यानच्या काळात अक्षय जावळकर सिव्हिल इंजिनीअर झाला. त्याने त्याचा व्यवसायही चालू केला. या काळातही अक्षय आणि मोहिनी यांचे संबंध कायम होते. या सर्व प्रकाराची कुणकुण सतीश वाघ यांना लागली होती.
सतीश वाघ अनैतिक संबंधात ठरत होते अडथळा
पुढे वाघ आणि जावळकर कुटुंबात वाद चालू झाले. त्यामुळे जावळकर कुटुंबाने वाघ दाम्पत्याची खोली सोडली. ते काही अंतरावर असलेल्या दुस-या भाड्याच्या खोलीत राहू लागले. मात्र तरीदेखील अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यात अनैतिक संबंध चालू राहिले. मोहिनी वाघ यांना नवरा सतीश वाघ यांच्याकडचे आर्थिक व्यवहार स्वत:कडे घ्यायचे होते. सोबतच सतीश वाघ अनैतिक संबंधाला अडथळा ठरत होते. त्यामुळेच मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकरला सांगून सतीश वाघ यांचा काटा काढण्याचे ठरवले.
९ डिसेंबर रोजी अपहरण आणि हत्या
पुढे मोहिनी वाघ, अक्षय जावळकर आणि जावळकरच्या मित्रांनी मिळून सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले आणि अवघ्या १५ मिनिटांत त्यांची हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणामुळे पुणे शहर हादरून गेले आहे.