कळंब : सतीश टोणगे
स्तुतिपाठकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने परखड लिखाण करणारे शोधूनही सापडत नाहीत. मोदी पर्वात तर विरोधात लिखाण केलेल्यांना दबाव आणून घरी पाठवण्यात आले. पूर्वी राजकारणी मंडळीच्या विरोधात लिहिल्यानंतर, ते चुका दुरुस्त करायचे. राजकारणात असूनही जिल्ह्याच्या राजकीय स्थितीवर फटकारे मारण्याचे काम प्रामाणिक, विश्वासू राजकारणीच करू शकतात. हेच काम नानासाहेब पाटील यांनी केले असून, ते पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचे धाडस त्यांनी केले आहे. पुस्तक वाचल्यानंतर, ‘आता परखड लिखाण करणारे राहिलेत कुठे..’अशी चर्चा होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या पदांवर प्रामाणिक काम करणारे, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, समाजकारण, राजकारण यातील प्रामाणिक माणूस म्हणून वेगळी ओळख निर्माण करणारे, मा. नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी विविध वर्तमानपत्रांत लिहिलेल्या परखड अशा लेखांचा संग्रह, ‘सत्य असत्याशी, मन केले ग्वाही….’या पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. दिवंगत भाई उद्धवराव पाटील यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. प्रामाणिकपणामुळे आजची राजकीय मंडळी त्यांच्यापासून चार हात लांबच असतात.
अकरा वर्षे नगरसेवक, सहा वर्षे नगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, यासोबतच त्यांनी अनेक पदांवर काम करून, त्या खुर्चीला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. राजकारण, समाजकारण, यामध्ये काम करताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी परखडपणे मांडले. या पुस्तकात शरद पवार, डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर लिखाण करून राजकारणातील चुका त्यांनी दाखवून दिल्या. शेतीभाती, उद्योग, राजकारण, कला, नाटक, संस्कृती यावर त्यांनी लेखन केले होते. काँग्रेसमध्ये राहून अनेक पदांवर काम करूनही कुणी चुकले असेल तर त्यांना त्यांनी नेहमीच फटकारले…..आता मात्र वेगळीच परिस्थिती आहे. नेता चुकला तरी तो कसा बरोबर आहे हे सांगण्याची धडपड पदाधिकारी व कार्यकर्त्यांत असते….त्यामुळेच, ‘आता परखड लिखाण करणारे राहिलेत कुठे…..’ असे मतदार म्हणू लागले आहेत. सध्याच्या राजकारणी मंडळींनी हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.