परभणी : वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध मृदंगवादक तालमणी कै. भक्तराज भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. परभणी शहरातील वसमत रोडव्रील श्री कृष्णा गार्डन येथे किराणा घराण्याचे प्रतिभावंत गायक पं. यादवराज फड यांची भक्ती – स्वरगंध ही अभंगवाणीची मैफिल आयोजित केली आहे.
पं. यादवराज फड यांच्या देशभरात चंदिगढ, दिल्ली, कोलकाता, बडोदा, इंदोर, राजकोट, अजमेर, रायपूर, पणजी, बेळगाव, बेंगलोर, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी मैफिली गाजल्या आहेत. दमदार आलाप प्रधान गायकी, स्वत: संगीत दिलेल्या रचनांचे भावपूर्ण सादरीकरण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
त्यांना तबला अविनाश पाटील, हार्मोनियम संजय गोगटे, मृदंग ऋतुराज भोसले, राधाकृष्ण गरड हे कलाकार साथसंगत करतील. पं. यादवराज फड यांचे गायनाअगोदर ऋतुराज भोसले- मनोज सोळंके यांचा पखवाज सोलो आणि मुरली मोहन गौडा यांचे रुद्रवीणा वादन होणार आहे. जगभरात विख्यात असलेल्या या नामवंत कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची व ऐकण्याची संधी रसिक प्रेक्षकांनी घ्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.