17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
HomeUncategorizedपरळीच्या औष्णिक केंद्रातील १५० कर्मचा-यांची बदली!

परळीच्या औष्णिक केंद्रातील १५० कर्मचा-यांची बदली!

गुन्हेगारीमुळे कर्मचा-यांचा स्थलांतरावर भर; स्थानिक बाजारपेठेला धक्का

बीड : विशेष प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी, राखेचे राजकारण अन् गुंडगिरीचे नवनवे प्रकरण समोर येत आहेत. अशातच राज्यातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रांपैकी एक असलेल्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचा-यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी थर्मल आणि त्याची राख चांगलीच चर्चेत आली होती. दरम्यान, बीडमध्ये काम करणारे कर्मचारी बाहेरील जिल्ह्यात बदल्या करून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये १०-२० नव्हे तर तब्बल १५० कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भुसावळ येथे उभारण्यात येत असलेल्या २५० मेगावॅटच्या प्रकल्पासाठी हे कर्मचारी हलवले गेल्याची माहिती आहे.

परळीत सध्या २५० मेगावॅटचे ३ युनिट आहेत. यासाठी तब्बल ९०० कर्मचारी या ठिकाणी काम करतात मात्र ७५० मेगावॅटचे संच परळीत असताना देखील अतिरिक्त कर्मचारी असल्याच्या नावाखाली परळीतून दीडशे कर्मचा-यांच्या बदल्या या भुसावळ येथे करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये स्वत: बदली अर्ज केलेले १२ जण तर कार्यालयाने बदली केलेले असे एकूण ९४ कर्मचारी भुसावळ येथील नवीन प्रकल्पाला हलवलेले आहेत. तर आणखी ५० कर्मचा-यांची बदली प्रस्तावित आहे. इतक्यावरच हे प्रकार थांबणार नसून परळीतील शेकडो कर्मचारी हे इतरत्र हलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दीडशेवर कर्मचा-यांच्या बदल्या झाल्याचे समोर येत असले तरी आणखी काही कर्मचारी या ठिकाणाहून इतरत्र हलवले जाणार असल्याची माहिती आहे. असे झाल्यास स्थानिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR