लातूर : सिद्धेश्वर दाताळ
दिपावलीचा सण अगदी उंबरठ्यावर येऊन ठेवला असल्याने शहरातसह जिल्ह्यात तयारी जोरदार सुरु झाली आहे. दिपावलीच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठांमध्ये विविध साहित्यासह मातीचे पणत्या मोठया प्रमाणावर दाखल झाले आहेत. पर्यावरणपूरक दिव्यांच्या मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी मातीच्या दिव्यांना अधिक पसंती मिळत आहे. दिपावलीसाठी दिवे खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होत आहे.
शहरातील बाजारपेठेच्या प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा विविध प्रकारच्या दिव्यांचे स्टॉल्स लागले आहेत. बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर विविध प्रकारचे मातीचे दिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साध्या मातीच्या दिव्यांपासून ते रंगीबेरंगी डिझाइन्सचे दिवे, हस्तनिर्मित दिवे, आकर्षक नक्षीकाम असलेले दिवे अशा विविध प्रकारचे दिवे नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. ग्रामीण भागासह स्थानिक कुंभारांनी तयार केलेल्या दिव्यांना विशेष मागणी असून यामुळे कुंभार समाजालाही रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्या आहेत.
यंदाच्या दिवाळीत अत्याधुनिक दिव्यांनाही मोठी मागणी आहे. यातच इलेक्ट्रॉनिक दिवे, एलईडी दिवे, पाण्यावरचे दिवे, सौरऊर्जा वापरणारे दिवे यांचेही दुकाने थाटलले बाजारात दिसत आहेत. हे आधुनिक दिवे १०० रुपये ते १००० रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना पर्यायांची विविधता मिळाली आहे. मातीच्या दिव्यांबरोबरच अत्याधुनिक दिव्यांनाही ग्राहकांची मोठी पसंती आहे. या दिव्यांचा वापर करून घरातील सजावट अधिक आकर्षक करता येते. मात्र, मातीचे दिवे पर्यावरणपूरक असल्यामुळे त्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.
दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी नागरिक उत्साहाने खरेदी करत आहेत. यावेळी स्वस्त आणि मस्त मातीचे दिवे विकत घेऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता वाढत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत दिसून येत आहे. शहरातील बाजारात मातीचे दिवे दाखल झाले असून ५० रुपये डझनपासून ते ५०० रुपये डझनपर्यंत मिळत आहेत. यात विविध आकार, रंग आणि डिझाइन्समध्ये मातीचे दिवे उपलब्ध आहेत. आकर्षक आणि आधुनिक दिवे सुद्धा बाजारात दाखल झाले असून १०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत किमतीचे दिवे बाजारात उपलब्ध झाले असून त्यांना अधिक मागणी आहे.