अक्कलकोट- दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. परिणामी पावसाचे प्रमाण कमी होऊन सर्वांनाच याचा फटका बसत आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाची चळवळ गतिमान करण्याची गरज आहे, असे मत माजी नगरसेवक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी मांडले. हन्नूर रोडवरील महर्षीविवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी कल्याणशेट्टी बोलत होते.
यावेळी महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या पूनम कोकळगी, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, कार्यक्रमाधिकारी प्रा. राजशेखर पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मातोश्री गुरुबसण्णा कल्याणशेट्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरण संवर्धनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे वृक्ष लागवड चळवळ थंडावली आहे. ती गतिमान करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना मानवहिताची असून त्यामुळे शुद्ध हवा तसेच पावसाचे प्रमाण वाढणार आहे. म्हणून प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे तरच पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहील. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असेही कल्याणशेट्टी यांनी नमूद केले.
दरवर्षी उन्हाचा प्रकोप वाढत आहे. विशेषतः उन्हाळ्यात सूर्य आग ओकत आहे. आगामी काळातही आणखी उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे. परिणामी, संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्वांनी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यासाठी युवक युवतींनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. दरम्यान, राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिंच, उंबर,
पिंपळ, करंजी वृक्षांचे रोपण केले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार सचिन कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन मसुती, रूपाली शहा, मलकप्पा भरमशेट्टी यांनी कौतुक केले. तसेच ‘झाडे लावा व झाडे जगवा’ असा संदेश देण्यात आला.सामाजिक संस्थांकडून कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण केले जाते. परंतु त्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारीदेखील सामाजिक संस्थांनी घेतली पाहिजे. वृक्षाचे संवर्धनदेखील केले पाहिजे, असे पूनम कोकळगी यांनी सांगितले.