28.8 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeसंपादकीयपलटूरामांची पलटी !

पलटूरामांची पलटी !

बिहारच्या व देशाच्या राजकारणात सतत उलट-सुलट भूमिका घेऊन कायम सत्तेत राहण्याचे कौशल्य प्राप्त केल्याने ‘पलटूराम’ अशीच ओळख असलेल्या नितीश कुमार यांनी पुन्हा एकवार पलटी मारत भाजपशी हातमिळवणी केल्याने बिहारमध्ये पुनश्च भाजप विरोधी बाकावरून सत्ताधारी बाकावर आला आहे. नितीश कुमार यांनी तीन वर्षांत दुस-यांदा पलटी मारली आहे. रविवारी सकाळी महाआघाडी सरकारचा मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यावर सायंकाळी लगेच रालोआ सरकारचा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करण्याचा पराक्रमही नितीश कुमार यांनी केला आहे. अवघ्या १८ महिन्यांपूर्वी भाजपची साथ सोडून नितीश कुमार यांनी राजद व काँग्रेसचा हात धरला होता व आता भाजपसोबत कधीच जाणार नाही अशी भीमगर्जना केली होती. एवढेच नाही तर भाजपच्या विरोधात विरोधकांची एकत्रित आघाडी उभारण्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला होता. त्यातून विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी अस्तित्वातही आली. भाजपनेही नितीश कुमारांसाठी दारे बंद केल्याची गर्जना केली होती. मात्र, आता अवघ्या १८ महिन्यांत पलटूराम नितीश कुमार भाजपला शरण गेले आणि भाजपनेही त्यांच्यासाठी आपले बंद केलेले दार उघडले! त्यामुळे आता केवळ नितीश कुमारच नाही तर ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून मिरविणारा भाजपही पलटूरामच्या रांगेत जाऊन बसला आहे.

नितीश कुमार व भाजप यांचा पलटी मारण्याचा इतिहास हा भारतीय राजकारणातील ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’चे उत्तम उदाहरणच ठरावे! जनता दलातून फुटून नितीश कुमार यांनी १९९४ मध्ये समता पार्टीची स्थापना केली व १९९५ च्या निवडणुकीत डाव्या पक्षांशी युती केली. मात्र, ते निवडणुकीत पराभूत झाले! पराभवानंतर त्यांनी डाव्या पक्षांशी काडीमोड घेत भाजपप्रणीत रालोआशी घरोबा केला. २०१३ पर्यंत म्हणजे १७ वर्षे ते भाजपसोबत होते. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून भाजपने नरेंद्र मोदी यांना निवडल्यावर नितीश कुमार यांचा राजकीय भ्रमनिरास झाला व त्यांनी रालोआसोबतचा आपला १७ वर्षांचा घरोबा तोडला. ते स्वबळावर लढले मात्र त्यांना फक्त दोन जागांवर विजय प्राप्त करता आला. त्यामुळे त्यांनी २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राजद व काँग्रेसशी युती केली. भाजपचा पराभव झाला व महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन नितीश कुमार मुख्यमंत्री बनले. मात्र, २०१७ मध्ये तेजस्वी यादव यांचे आयआरसीटीसी घोटाळ्यात नाव आल्याचे कारण पुढे करून त्यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला ४३ तर भाजपला ७४ जागा मिळाल्या. भाजपने चिराग पासवान यांचा व्यवस्थित वापर करत नितीश कुमार यांच्या जेडीयूचे संख्याबळ कमी केले. मात्र, तरीही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले. तथापि, सरकारमध्ये भाजपचा वरचष्मा राहील याची भाजपने पूर्ण व्यवस्था केली. अगोदरच निवडणुकीत भाजपने केलेल्या खच्चीकरणाने दुखावलेल्या नितीश कुमार यांना सरकारमधील कुचंबणा सहन न होणारीच होती. त्यामुळे भाजपला धडा शिकवण्यासाठी नितीश कुमार यांनी राजद व काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय २०२२ मध्ये घेतला व ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले. त्यांनी भाजपला राष्ट्रीय पातळीवरही धडा शिकवण्याचा संकल्प सोडला व विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून इंडिया आघाडी जन्मालाही आली. मात्र, इंडिया आघाडीच्या बंगळुरू येथील बैठकीनंतर नितीश कुमार नाराज झाले. त्यांचा पुन्हा राजकीय भ्रमनिरास झाला कारण इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे गेले.

शिवाय या बैठकीत जागावाटपाचा मुद्दाही मार्गी लागला नाही. त्यात बिहारचे मुख्यमंत्रिपद तेजस्वी यादव यांच्याकडे सोपविण्याचा आग्रह लालू यादव यांनी धरला होता. लालूंच्या या प्रस्तावाने नितीश कुमार पुरते बिथरले व त्यांनी पुन्हा रालोआसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपलाही हेच हवे होते कारण संख्याबळाच्या दृष्टीने जास्त मदार असलेल्या बिहार राज्यात भाजपला जेडीयू-राजद-काँग्रेस या तीन पक्षांच्या आघाडीचा सामना करणे अवघडच बनले होते. त्यामुळे या आघाडीत फूट पडावी यासाठी भाजप प्रयत्नरत होताच. नितीश कुमार यांनाही आपले मुख्यमंत्रिपद काहीही करून वाचवायचे होते. त्यामुळे दोघांनीही आपल्या भीमगर्जना १८ महिन्यांतच बासनात गुंडाळून पुन्हा एकमेकांचा हात हाती धरला आहे. भाजपने बिहारमध्ये नितीश यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. इंडिया आघाडीच्या ऐक्याला खिंडार पाडणे ही भाजपची या घडीची सर्वांत मोठी राजकीय गरज होती.

त्यातच ज्या राज्यात भाजपला संख्याबळ वाढविण्याची आशा आहे तिथे इंडिया आघाडी कमकुवत होणे भाजपसाठी गरजेचे होते. पलटूराम नितीश कुमार यांनी आपल्या सत्ताग्रहासाठी भाजपची ही गरज पूर्ण करून दिली आहे. त्यामुळे भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपद विनाअट बहाल करण्यात काहीच आश्चर्य नाही. मात्र, मंत्रिमंडळात व सरकारमध्ये भाजपच वरचढ राहील याची पूर्ण दक्षता घेतली जाईलच! लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे संख्याबळ प्राप्त केले तर मात्र बिहारमध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ होऊ शकते. कदाचित त्यावेळी महाराष्ट्रात वापरलेला पक्षच हायजॅक करून सत्ता मिळविण्याचा फॉर्म्युला नितीश कुमार यांच्या जेडीयूबाबत वापरला जाऊ शकतो. कारण नितीश व भाजप यांचा आताचा घरोबा परस्पर विश्वासाने वा मनोमिलनामुळे झालेला नाही तर निव्वळ गरजेपोटी झालेला आहे. आणि ‘गरज सरो वैद्य मरो’ हा मंत्र वापरण्यात नितीश व भाजप हे दोघेही अत्यंत तरबेज आहेतच! त्यामुळे या घडीला लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रिपद कायम आहे,

हे नक्की! या सगळ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या इंडिया आघाडीला धक्का देण्यात भाजप यशस्वी झाला आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी व पंजाबमध्ये ‘आप’चे मान यांनी काँग्रेसशी जागावाटपास दिलेल्या नकारानंतर इंडिया आघाडीत निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असताना नितीश कुमार यांनी आपल्या सत्ताग्रहासाठी स्वत:च पुढाकार घेऊन उभारलेल्या इंडिया आघाडीला धक्का दिला आहे. राजद व काँग्रेसला यातून सावरण्यासाठी आता प्रचंड वेगाने व ताकदीने प्रयत्न करावे लागतील. तूर्त मागची १७ वर्षे बिहारच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याचे कौशल्य दाखविणारे पलटूराम नितीश आता नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देशातले पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या या विक्रमाचे श्रेय त्यांच्या पलटी मारण्याच्या कौशल्यास द्यावे लागेल, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR