लातूर : प्रतिनिधी
एक प्रेमी युगूल पळून गेले. पालकांनी मुलगी हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी त्यांना शोधलेही. पण पोलिसांनी त्यांचे प्रेम पाहता दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलवत त्यांच्या संमतीने पोलीस ठाण्याच्या दारातच त्यांचे लग्न लावून दिले. लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात ही घटना घडली असून या विवाहीची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
संबंधित मुलीच्या वडिलांनी दि. ३० एप्रिल रोजी मुलगी हरवल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस तपास करत असतानाच पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. डी. जाधव यांनी या तरुणीला शोधून ताब्यात घेतले. त्यावेळी ती तिच्या प्रियकरासोबत असल्याचे त्यांना आढळून आले. या प्रेमी जोडप्याने एकमेकांसोबत लग्न करण्याची ईच्छा पोलिसांसमोर व्यक्त्त केली. यानंतर पोलिसांनी या तरुणीच्या पालकांशी संपर्क साधत चौकशी केली. विशेष म्हणजे यावेळी मुलीच्या घरच्यांनी लग्नाला संमतीदेखील दाखवली. परंतु त्यांनी हे लग्न पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच व्हावं, असा आग्रह धरला. त्यामुळे विवहा सोहळा मोठ्या थाटामाटात पोलीस ठाण्याच्या दारातच झाला.