26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरपहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात ‘माझं लातूर, हरित लातूर’ उपक्रमातून वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पाहिलेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आज शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण करण्यात आले. लातूर तालुक्यातील वरवंटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदविला. शाळा प्रवेशोत्सव आणि वृक्षारोपणासाठी आयोजित कार्यक्रमात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी या बैलगाडीचे सारथ्य
केले.
शाळेच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात शिक्षकांनी या मुलांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देवून शाळेमध्ये स्वागत केले. या विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात नेवून त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी संवाद त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे, असे सांगितले. तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचेही वाटप करण्यात आले.
इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून, त्याच्या नावे शाळेच्या परिसरात एक झाड लावण्याचे, तसेच विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला या झाडाचाही वाढदिवस साजरा व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी ‘विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता पहिलीत प्रवेश घेत असून त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, गटशिक्षणाधिकारीजाधव, धनराज गीते, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सी. बी. ठाकरे वरवंटीचे सरपंच पवन जाधव, उपसरपंच राजेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवेश्वर लांडगे, उपाध्यक्ष रमा कांबळे, ग्रामसेवक अशोक लामदाडे, मुख्याध्यापक रामेश्वर  गिल्डा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व पालक यावेळी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR