22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरपाऊल टाक अजून कणखर..पाठीवरती घेऊन दप्तर!

पाऊल टाक अजून कणखर..पाठीवरती घेऊन दप्तर!

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर व परिसरातील गझलकार व कविंच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शब्दपंढरी प्रतिष्ठानचे गझल संमेलन येथील जयक्रांती महाविद्यालयाच्या सभागृहात प्रचंड उत्साहात झाले. यावेळी वंदना केंद्रे यांनी सादर केलेल्या पाऊल टाक अजून कणखर… पाठीवरती घेऊन दप्तर!, या गझलेने सर्वांची मने जिंकली.
या गझल संमेलनास प्रमुख पाहूणे म्हणून युनूस पटेल यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी अजय पांडे होते. उद्घाटन प्रशांत घार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना प्रशांत घार म्हणाले, गझल ही कवितेची कविता असल्यामुळे गझलेचे सौष्ठव खूप देखणे असते व ती ऐकल्याने जगण्यातील सौंदर्य वाढते. प्रमुख पाहुणे मुहम्मद युनूस पटेल म्हणाले की, साहित्य हे माणसांना एकमेकांशी प्रेमाने जोडण्याचे काम करते. वंदना केंद्रे यांनी
पाऊल टाक अजून कणखर…
पाठीवरती घेउन दप्तर..
भिऊ नकोस काट्यांना तू…
रस्ता आहे मोठा खडतर..
या गझलेतून मुलींंना कणखर व धाडसी होण्याचा सल्ला दिला.
विश्वंभर इंगोले यांनी,
सांग प्रिये तू, काय लिहावे,
रित्या मनाने, रितेपणावर..
मोहरणे जणु विसरुन गेला,
चाफा माझा तू गेल्यावर..
या गझलेतून प्रेयसीच्या विरहामुळे त्यांच्या मनातील चाफा सुकल्याची जीवघेणी सल व्यक्त्त केली.
कवी योगिराज माने यांनी,
सौख्य बांधले सुरात मी..
दु:ख कोंडले उरात मी..
साद घालुनि वा-याला..
नाव सोडली पुरात मी..
ही गझल सादर सादर करुन उपस्थितांना आयुष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष अजय पांडे यांनी,
जरी सावलीच्या निवा-यात आहे..
कवडसा स्वत:च्याच तो-यात आहे..
जुन्या आठवांचे किती मूल्य सांगू..
खरे मोल त्यांचे घसा-यात आहे..
ही गझल सादर करुन प्रत्येकाच्या आयुष्यातील जुन्या परंतु अनमोल आठवांचे मोल अधोरेखित केले. याप्रसंगी डॉ. बी. आर. पाटील यांनी शब्दपंढरी प्रतिष्ठानच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सुरेश गीर, डॉ. नरसिंग भिकाने, जना घुले, प्रदीप कांबळे, विवेक डोळसे,ऋचा पत्की, दिनेश भिसे, देवदत्त मुंढे, अरविंद मलवाडे, दिलीप लोभे, डॉ. प्रणिता चाकूरकर व मान्यवर गझलप्रेमी उपस्थित होते. योगिराज माने यांनी प्रास्ताविक, दयानंद बिराजदार यांनी सूत्रसंचलन तर नामदेव कोद्रे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमित भालके, इब्राहीम सय्यद, मयूर आवळे, रामदास जाधव आणि शब्दपंढरी परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR