22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचे केंद्राचे धोरण

पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचे केंद्राचे धोरण

बीड : प्रतिनिधी
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमध्ये विविध प्रश्नांवर खडाजंगी पाहायला मिळत असून विरोधक सरकारला घेरताना दिसून येत आहेत. दरम्यान बीडमधून जयंत पाटलांनी सरकारला चांगलेच सुनावले आहे. भारतातल्या कांद्याला मारायचे आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचे हे केंद्राचे धोरण असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढावा घेत आहेत. आज ते बीडमध्ये होते. विधानसभेसाठी जिल्ह्यातील तयारीचा रोड मॅप ठरवताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकसभेतील विजय घटक पक्षांच्या मेहनतीमुळेच
बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या सोपा नाही. इथले प्रश्न दिल्लीत बसून सोडवायची गरज होती. बीडचा प्रश्न सोडवायचा असेल तर अतिरिक्त पाणी आणावं लागेल असं म्हणत लोकसभेतील विजय घटक पक्षातील मेहनतीमुळेच झाला असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

पीक विम्याचा प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी
पीक विम्याचा प्रश्न सरकारला सोडवता आला नाही. पीक विम्यामध्ये सगळ्यांचेच हात ओले होतात असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी सरकारवर केला आहे. भारतातल्या कांदा निर्यातीवर कर तो ही ४० टक्के! भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे केंद्र सरकारचं धोरण आहे. निवडणुका आल्या आहेत आता कपडे काढून द्यायलाही हे तयार असल्याची जोरदार टीका जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR