लातूर : प्रतिनिधी
संपलेल्या मान्सूनमध्ये लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरी एवढाही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये नव्याने लक्षणिय पाणीपातळी वाढली नाही. उलट जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांत फक्त २१.६२ पाणीसाठा आहे. आठपैकी तीन मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपलेला आहे. त्यामुळे हिवाळ्यातच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आतापासूनच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
दरवर्षी लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत नाही. तसे यंदाच्या पावसाळ्यातही दिसून आले. पावसाळ्यापुर्वीच यंदा मान्सुन वेळेवर येईल, चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. परंतू, पावसाने सर्व अंदाज चुकवले. यावर्षी जिल्ह्यात पावसाने नेहमीप्रमाणे हूलकावणी दिली. मोठे आणि सलग पाऊसच पडले नाहीत. त्यामुळे याचा परिणाम जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यावर झाला आहे. जवळपास सर्वच प्रकल्प पाण्याने पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत. त्या उलट प्रकल्पांतील पाण्याचा उपसा सातत्याने होत आहे. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वेगाने घट होताना दिसत आहे.
जिल्ह्याच्या दृष्टीने मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प महत्वाचे आहेत. यात लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात सध्या ३८.२५२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी २१.६२ एवढी आहे. तर निम्न तेरणा प्रकल्पात सध्या १२.७७५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १४.०० एवढी आहे. म्हणजेच या दोन मोठ्या प्रकल्पांत सध्या ५१.०२७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १९.०३ आहे. जिल्ह्यात तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी आणि मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प आहेत. यात एकुण उपयुक्त पाणीसाठा २४.१९६ दशलक्ष घनमीटर असून त्याची टक्केवारी १९.८१ इतकी आहे.
या आठ पैकी तावरजा, व्हटी आणि तिरु या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपलेला आहे. जिल्ह्यात १३४ लघू प्रकल्प आहेत. यात ६९.३७८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी २२.०८ एवढी आहे. आधीच प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यात उपसा वाढला त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा वेगाने कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी पाच-सहा महिने आहेत. सध्या प्रकल्पांत आहे ते पाणी येत्या पाच-सहा महिन्यांपर्यंत कसे पुरेल, याचे सुक्ष्म नियोजन करण्याची नितांत गरज आहे. तसेच नागरिकांनीदेखील पाण्याचा अतिवापर टाळून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.