22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसंपादकीयपावसाचा तडाखा

पावसाचा तडाखा

सुमारे महिनाभरापासून मुक्कामास असलेल्या पावसाने गुरुवारी राज्याला जोरदार तडाखा दिला. जोरदार पावसामुळे विविध जिल्ह्यांत सहा जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. पुण्यासह मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला बुधवारी रात्रीपासूनच पावसाने झोडपून काढले. पावसामुळे मुंबईत रेल्वे व रस्ते वाहतूक मंदावली. कोल्हापूरमध्ये पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने सांगली, कोल्हापूर भागात पुराचे पाणी शिरले. हवामान विभागाने शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या भागातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.

पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात काही दिवसांपासून जोरधारा बरसत आहेत. पुण्यात ढगफुटी झाल्याने पुणे जलमय झाले. बुधवारी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरुवारीही कोसळत होता. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. पुणे शहरात पाणीपुरवठा करणा-या चार साखळी धरणांच्या परिसरात अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण भरले. त्यामुळे धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीची पाणी पातळी बुधवारी रात्री एकदम वाढली. त्यामुळे सिंहगड परिसरातील नदीकाठच्या अनेक सोसायट्या जलमय झाल्या. अनेक भागात छातीपर्यंत पाणी आले. सतत कोसळणा-या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले. त्यात अडकलेल्या लोकांना बोटीद्वारा बाहेर काढण्यात आले. शहरातील अग्निशमन दल, पोलिस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफसह अन्य एजन्सी विविध भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत होते. बचाव पथकाने लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा आणि दोरींचा वापर केला. निबंजनगर, डेक्कन जिमखाना, सिंहगड रोड हा परिसर पावसामुळे सर्वाधिक प्रभावित आहे.

पाण्यात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अडकली होती. पुणेकर गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यात शिरून आपले सामान वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पुण्याच्या अनेक भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. एकीकडे कोसळणारा पाऊस थांबत नव्हता आणि दुसरीकडे धरणे काठोकाठ भरल्याने धरणातून पाणी सोडले जात होते. पहाटेच्या सुमारास खडकवासला धरणातून कुठलीही पूर्वसूचना न देताच पाणी सोडल्याने पूरस्थितीत आणखी भर पडली. अनेक भागात पाणी साचून इमारती आणि घरांमध्येही पाणी शिरले. भिडे पूल, गरवारे कॉलेज वस्ती, डेक्कन, शीतलादेवी मंदिर, संगम पूल, होळकर पूल, कॉर्पोरेशन परिसरात पाणीच पाणी साचले. पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. लवासा येथे ४५३ मि.मी., लोणावळा येथे ३२२ मि.मी. पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड भागातील इमारतींमध्ये पाणी शिरले. सखल भागात गुडघ्याहून अधिक पाणी साठले होते. पुण्यात पूरस्थितीनंतर प्रशासनाच्या यंत्रणा कामाला लागल्या. परंतु अनेक भागात त्या कमी पडल्याचे चित्र होते.

कुठलीही पूर्वसूचना न देता पहाटे खडकवासलाचे पाणी सोडल्याने अनेकांना घरातील, दुकानातील सामान हलवता आले नाही. राज्यात तीन दिवसांपासून संततधार होती. बुधवारी सायंकाळी पावसाने रौद्र रूप धारण केले. कोकण, कोल्हापूर, सांगली आदी भागात पावसाचा जोर होता. यंदा पुण्यात तर विक्रमी पाऊस झाला. शहरात पावसाने चार बळी घेतले. जोरदार पावसाने पुण्याची जी दैना केली त्याचे आता कवित्व सुरू होईल. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांना दूषणे देण्याची स्पर्धा सुरू होईल. यात एक प्रश्न अनुत्तरित राहील, तो म्हणजे पावसाळ्यात पाऊस तर येणारच आहे. नागरिकांना थोडाफार त्रास सहन करावा लागणारच आहे. परंतु हा त्रास असाच होत राहणार का? तो आटोक्यात कधी येणार? त्यावर काही तोडगा नाहीच का? अलिकडे वरुणराजा लहरी बनला आहे. त्याचे नेम आणि नियम बदलले आहेत हेही आपल्या लक्षात आले आहे.

तरीही त्यानुसार उपाययोजना का केली जात नाही? सावधगिरीचे उपाय शोधण्याचे शहाणपण कधी येणार? धरणातून पाणी सोडणार असल्याची माहिती अगोदरच नागरिकांना का दिली गेली नाही? पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कंट्रोल रूममधून स्थितीचा आढावा घेऊन जुजबी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, पुणे आणि परिसराला रेड अलर्टचा इशारा बुधवारीच देण्यात आला होता. खडकवासलाच्या वरच्या भागात ८ इंचापेक्षा अधिक पाऊस झाला तर पुण्यात सुमारे पाच इंच पाऊस झाला. रात्रीच धरणातून पाणी सोडले असते तर नागरिकांना अधिक त्रास झाला असता. त्यामुळे सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. पुणे शहरातील बहुतांश रस्ते आणि भुयारी मार्ग पाण्याखाली गेले होते. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अन्य पथके नागरिकांना मदत करत होती. काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे कोणत्याही आदेशाची वाट न पाहता उत्स्फूर्तपणे पूरस्थितीचा सामना करत होते. संकटकाळातील त्यांची तत्परता कौतुकास्पद होती.

पण संकट टाळण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार सरकार कधी करणार? पावसाळ्यात मुंबईसारखी शहरे तुंबतात हे नित्याचे झाले आहे. रोगावर तात्पुरती मलमपट्टी करून भागत नाही हे सत्ताधा-यांच्या लक्षात येत नाही असे नाही, कळत नाही असे नाही, वळत नाही हेच खरे दुखणे आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असे सरकार घसाफोड करून सांगते पण जनता ऐकत नाही. निसर्ग मात्र ऐकतो…. आता पाणी अडवावेच लागत नाही! ऋतू सुरू झाला की चर्चा सुरू होतात आणि ऋतू बदलला की सारेच विसरले जाते! राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असताना मराठवाड्यातही पाऊस पडतो आहे मात्र, त्यात जोर असा नाही, केवळ भुरभुर सुरू आहे. रिमझिम पाऊस होत असल्याने नदी-नाल्यांतून पाणी वाहताना दिसत नाही. त्यामुळे लहान-मोठ्या प्रकल्पातील पाणी पातळी वाढलेली नाही. सारा निसर्गाचा खेळ!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR