26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeसोलापूरपावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरीकांचे हाल

पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरीकांचे हाल

सोलापूर: पावसामुळे शहरातील काही लोकवस्त्यांमध्ये अचानक पाणी घरात शिरले. गुडघ्याएवढे पाणी झाल्याने बहुतांश नागरिकांनी मुलाबाळांसह रात्र जागून काढली. सकाळी घरातील पाणी बाहेर काढण्यात लोकांचा वेळ गेला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कुठे आहे महानगरपालिकेची यंत्रणा? असा सवाल केला.

शहरातील अनेक भागांमध्ये लोक घरातील पाणी बाहेर काढून टाकत होते. मात्र, पाऊस सुरू असल्याने ते कमी होत नव्हते. उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्याने लोकांनी रात्र जागून काढली. सकाळी हळूहळू पाण्याचा निचरा होऊ लागल्यानंतर नागरिकांनी घरातील पाणी उपसण्यास सुरुवात केली. संसारोपयोगी साहित्य, धान्य व कपडे भिजून चिंब झाले होते.

जय मल्हार मातंग वस्ती (बुधवार पेठ) परिसरातील प्लॉट नं. १७ येथील एका लाइनने असलेल्या सुमारे १७ घरांमध्ये पाणी शिरले होते.
घरातील वृद्ध लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. परिसरातील शौचालयात पाणी तुंबल्याने स्थानिक नागरिकांची अबाळ झाली. हातावरचं पोट असलेल्या महिला पुरुषांनी रोजगार टाळून घर स्वच्छ व नीटनेटके करण्यात दिवस घालवला. घरावरील पत्रे गळू लागल्याने सकाळी अनेकांनी प्लास्टिक लावून घेतले.

कल्याणनगरात अवघ्या दोन महिन्यांच्या मुलाच्या मातेचे मोठे हाल झाले.जय मल्हार चौकातील घरामध्ये रात्रभर पावसाचे पाणी होते. त्यामुळे भितींना ओल आली आहे.
जय मल्हार चौक, मातंग वस्ती येथे ड्रेनेज लाइन आहे. मात्र, त्या ठिकाणी होल नसल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. ड्रेनेजवर सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. या प्रकारामुळे स्थानिक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

जुना पूना नाका येथील मडकी वस्ती परिसरातील नाला सकाळी ओव्हरफ्लो झाला होता. नाल्यावरील रस्त्यावरून वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करीत होते. मडकी वस्तीकडे जाण्यासाठी जुना कारंबा नाका येथील स्मशानभूमीपासून हा एकच रस्ता असल्याने नागरिकांचा नाइलाज होतो.गेल्या अनेक वर्षांपासून हा धोका स्थानिक नागरिक प्रत्येक पावसाळ्यात अनुभवत आहेत. रस्त्याच्या कडेला कोणतेही सुरक्षा कठडे नाही. पाण्याचा वेग वाढला तर वाहून जाण्याची स्थिती निर्माण होते.

स्थानिक विद्यार्थ्यांना याच ठिकाणावरून शाळेला जावे व यावे लागते. महापालिकेने या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केली नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मंगळवार बाजार येथील साखर पेठ परिसरातील पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या घरामध्ये रात्री पाणी शिरले. हे पाणी गुडघ्याच्या वर होते, त्यामुळे घरातील कुटुंबीयांची तारांबळ उडाली. घरातील लोक चढावर असलेल्या ठिकाणी जाऊन बसले. पाणी पहाटेपर्यंत असेच थांबले होते.

शेवटी पहाटे बाहेरील पाण्याचा हळूहळू निचरा होऊ लागला.जुना विजापूर नाका येथील मीटरगेज रेल्वे रुळ परिसरातील अनेक घरांत पाणी गेले. विजापूर रोडपासून सुरू असलेला रस्त्याच्या उतार हा विजापूर नाका येथे संपतो. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी आले. संजय गांधी नगर येथील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. हे पाणी काढताना घरातील सर्व सदस्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पूर्ण रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी आल्यामुळे गोधडी, सतरंजी, चादर भिजून गेले. त्यामुळे रात्र कुडकुडत जागून काढावी लागल्याचे नागरिकांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR