मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पावसाने नुकतीच हजेरी लावली आहे. राज्यात पावसाने जोर धरला आहे. याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढली असली तरीही भाज्यांचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मागील काही दिवस पुरेसा पाऊस न पडल्याने भाज्यांचे उत्पादन कमी झाले होते. परिणामी आवक घटली अन् भाज्यांचे दर वाढले. परंतु आता बाजारात आवक वाढली असली तरीही भाज्यांचे दर वाढले आहेत. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये फळभाज्यांचे दर वाढले आहेत. तर पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत.
बाजारात सध्या फरसबी १०० रुपये प्रति किलो विकली जात आहे. घेवडा ५५ रुपये तर काकडी २६ रुपये किलो विकली जात आहे. शेवग्याच्या शेंगा ८५ रुपये, वाटाणा १७० रुपये तर फ्लॉवर २८ रुपयांवर विकला जात आहे. गाजर २६ रुपये, ढोबळी मिरची ४० तर भेंडी ५० रुपयांवर विकली जात आहे. चवळीची शेंग ४० रुपये आणि सुरण ६० रुपयांना विकले जात आहे.
पालेभाज्यांच्या किमती
पावसाने हजेरी लावल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हिरव्या पालेभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पालेभाज्यांच्या किमती कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीर १५ रुपये, मेथी १२ तर पालक १२ रुपये प्रति जुडी विकली जात आहे. कांद्याची पात १६ रुपये तर मुळा ६० रुपयांना विकला जात आहे.