25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयपीएम विश्वकर्मा योजनेतून कौशल्याला मिळणार ऊर्जा

पीएम विश्वकर्मा योजनेतून कौशल्याला मिळणार ऊर्जा

वर्ध्यातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास
वर्धा : प्रतिनिधी
पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. यामध्ये सर्वाधिक भागिदारी एससी-एसटी आणि ओबीसीची आहे. या समुहातील कारागीर उद्योजक व्हावेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते झाला. बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळते, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ््यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योग, शिल्पकला, धातूविज्ञान, अभियांत्रिकी अशा सा-याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. महात्मा गांधींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन दिले. परंतु स्वातंत्र्यानंतर बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली.

८ लाख शिल्पकारांना
कौशल्य विकास प्रशिक्षण
देशातील ७०० वर जिल्हे, २.५ लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. १० लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून ८ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात महाराष्ट्रातील ६० हजारांहून अधिक कारागीर समाविष्ट आहेत. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

जागतिक बाजारपेठ
मिळवून देऊ : शिंदे
देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणा-या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेतून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही भाषण झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR