22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर कायम

 पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर कायम

पुणे  प्रतिनिधी-
 राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून आगामी तीन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कृष्णा आणि भीमा खो-यातील धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून खरिपाच्या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात आले.
हवामान खात्याच्या माहितीनुसार गुजरात ते केरळ किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, तसेच कोकण आणि अन्य भागात पुढील तीन-चार  दिवस पावसाचा जोर कायम राहील. मुंबई किनारपट्टी, पश्चिम घाटमाथ्यावर संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. साधारण मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या विविध भागात आजवर सरासरी १२४ टक्के पाऊस झाला आहे. खरिपाच्या पेरण्या समाधानकारक झाल्या आहेत. राज्यात खरिपाचे क्षेत्र १४२.२ लाख हेक्टर असून आजवर ९० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली आहे तर अन्य पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. पुण्याजवळील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे आणि त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
भीमा आणि कृष्णा खो-यातील धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेले दोन-तीन दिवस शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असून सखल भागात पाणी साठले आहे तसेच काही भागात रस्त्यावरून पाणी वहात  आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR