पुणे : वृत्तसंस्था
लोहगाव येथील विमानतळामुळे पुणेकरांचा हवाई प्रवास सोयीचा झाला असून, पुण्यातून विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुण्यातून यंदा देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उडान योजनेमुळे पुणेकरांचा देशांतर्गत प्रवास सोपा झाला असून, नव्या वर्षांत यात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पाच महिन्यांपूर्वीच नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणे सुरू करण्यात आली. सुरुवातीला जुन्या टर्मिनलवरून नव्या टर्मिनलवर दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विमानांची संख्या वाढविण्यात आली. तसेच दैनंदिन विमान उड्डाणांची संख्या साधारणपणे १९० पर्यंत असून, शनिवार, रविवार यांची संख्या वाढत आहे. सध्या पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढल्याने दैनंदिन ३० हजारांच्या पुढे प्रवासी येथून प्रवास करत आहेत. नव्या टर्मिनलवर अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे प्रवास आरामदायी होत आहे. त्यातच पुणे विमानतळ प्रशासनाने देशांतर्गत राज्ये, शहरांना ‘उडान’ या योजनेंतर्गत १२ ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढविली आहे. त्याचा फायदा पुणेकर प्रवाशांना होत असून, विमानाने प्रवास करणे सोपे झाले आहे.
‘उडान’ योजनेचा फायदा
पुणे विमानतळावरून ‘उडान’ योजनेंतर्गत नव्या १२ ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली. याशिवाय अहमदाबाद, चेन्नई, भोपाळ या ठिकाणी उड्डाणांची संख्या वाढविली आहे. पुण्यातून १ हजार १८० विमान उड्डाणे झाली आहेत. त्यातून ६९ हजार ६४६ प्रवाशांनी प्रवास केला. पुण्यातून सिंधुदुर्ग, नांदेड, जळगाव, किशनघर, भावनगर, प्रयागराज या शहरांसाठी ही विमाने सुरू आहेत.