पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्ध्वस्त केले. एटीएसच्या छाप्यात तब्बल ३,७८८ सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि सिमबॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.
पुण्यात अतिरेक्यांच्या कारवाया यापूर्वीच उघड झाल्या होत्या. देशविरोधी तत्वांना विदेशातून येणारे कॉल भारतीय गुप्तचर यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज उभारले गेले होते. पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धीकी या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. नौशाद अहमद सिद्धीकीचा दहशतवाद्यांशी संबंध आहे का? या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे.
कोंढव्यातील मिठानगर येथे असलेल्या एम. ए. कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृत एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड एटीएसला मिळाले. तसेच सात सिम बॉक्स, वायफाय इतर साहित्य पोलिसांना मिळाले. कोंढव्यात अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. परंतु त्याची माहिती पोलिसांनी मिळाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.