पुणे : प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाल्मीक कराडला फाशी झाली पाहिजे, मारेक-यांना कठोर शिक्षा द्या, अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिकांनी एकत्र येत लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा काढला.
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. बीड, परभणीमध्ये निषेध मोर्चा काढल्यानंतर पुण्यातही जनआक्रोश मोर्चातून बीड हा दहशतीचा बालेकिल्ला झाला आहे, असे सांगण्यात आले. कराडसारखे गुन्हेगार मोकाट फिरू लागले आहेत. यामुळे त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी गृहमंत्री दवेंंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच सरकारने बीड प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती करणार असल्याचे देखील नागरिक यावेळी म्हणाले.
जोडे मारो आंदोलन
या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संतप्त भावना पहायला मिळाल्या. तसेच नागरिकांनी कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. कराडला अटक झाली असली तरी तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला.