पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी १ लाख ५३ हजार ९६० मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारांत मोठ्या साहेबांचा आजही दबदबा असल्याचे दिसून आले. त्यामुळे, खासदार सुप्रिया सुळेंचे आता गावोगावी जल्लोषात स्वागत होत आहे. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना उद्देशून घोषणाबाजीही करण्यात आली. दादांना सांगा ताई आली… असे म्हणत पुण्यातील सुप्रिया सुळे समर्थकांनी मोठा जल्लोष केला. सुप्रिया सुळेंना विजयाच्या गुलालाने रंगवण्यात आलं होतं.
यावेळी, सुप्रिया सुळे यांच्यासह समर्थकांच्या चेह-यावर विजयाचा आनंद स्पष्टपणे झळकत असल्याचे दिसून आले. राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात ताई विरुद्ध वहिनी असा सामना रंगला होता. त्यामुळे, सुळे विरुद्ध पवार असा घरगुती सामना बारामती लोकसभा मतदारसंघात रंगल्याने देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते.