मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारे ठेकेदार शिंदेंच्या मर्जीतले, त्यांना किती कमिशन मिळाले? असा सवाल करत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली आहे. अवघ्या ८ महिन्यांपूर्वी अनावरण करण्यात आलेल्या या पुतळ्याची पहिल्याच पावसात अशी अवस्था झाल्यामुळे मूर्तिकार जयदीप आपटे यांच्यावर टीकास्त्र डागले जात आहे.
दरम्यान, मालवणमध्ये राजकोट या ठिकाणी बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या हा पुतळा अवघ्या ८ महिन्यांमध्ये कोसळला. यामुळे महाविकास आघाडीचे नेते नाराज व आक्रमक झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत या पुतळ्याचा ठेकेदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील असल्याचे देखील खासदार राऊत म्हणाले आहेत.
खासदार राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. हा पुतळा ज्या पद्धतीने आम्ही कोसळताना पाहिला, तो आमच्या महाराष्ट्राच्या हृदयावरील आघात कधीही भरून निघणार नाही. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाते किंवा ते चालवले जाते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या मतांचा विचार करत घाईघाईत या पुतळ्याचे उद्घाटन केले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगण्यात आलं होतं की इतक्या घाईत तुम्ही पुतळ्याचे अनावरण करू नका. तरीही घाईघाईने पुतळ्याचे अनावरण केले. त्या पुतळ्याच्या बांधकामावर, शिल्पकलेवर अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला. तरीही तो पुतळा घाईघाईने बसवण्यात आला आणि काल तो पुतळा कोसळला. कधी वाटलं नव्हतं महाराष्ट्रावर ही वेळ येईल, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.
तुम्ही महाराजांना देखील सोडलं नाही
पुढे खासदार राऊत म्हणाले, या महाराष्ट्रात छत्रपतींचा असा अपमान कधीही झाला नव्हता. आग््रयातून छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप सुटून बाहेर आले. पण आपल्या राज्यात त्यांच्यावर कोसळून पडण्याची वेळ आली. सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुतळ्याचे काम केले. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना नेहमीप्रमाणे हे काम दिले. यात त्यांना किती कमिशन मिळालं, याचा हिशेब लावावा लागेल. ठेकेदार, शिल्पकार सर्व ठाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांत पहिले मी मुख्यमंत्री यांचा राजीनामा मागतो. तुम्ही महाराष्ट्राच्या भावनांशी खेळला आहात. आपापल्या लोकांना टेंडर आणि कामे दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांना तरी सोडा, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.