पुणे : प्रतिनिधी
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड हत्या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली असून धनंजय मुंडे यांना धमकी दिली आहे. यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांना धमकी दिल्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे.
दरम्यान, राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ९ डिसेंबर रोजी हा प्रकार झाल्यानंतर तपासामध्ये दिरंगाई दिसून आली. यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील या प्रकरणामध्ये स्वत: लक्ष घातले आहे. तसेच जरांगे पाटील यांनी बीडमधील सर्वपक्षीय मूकमोर्चाला उपस्थिती लावली होती. यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये नवा वाद सुरू झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलिस ठाण्यामध्ये धमकवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अशी कोणत्याही प्रकारची धमकी देण्याचा प्रयत्न केला तर मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा धमकीवजा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
लक्ष्मण हाके यांचे प्रत्युत्तर
काळ २००- २५० वर्षांपूर्वीचा नाही, मला वाटते अशी चिथावणीखोर वक्तव्ये मनोज जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा. धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू न द्यायला कोण आहेत ते जरांगे? जरांगे गुंड आहेत? जरांगे कुणी एसपी आहेत? कोण आहेत जरांगे? कायदा यांच्या मालकीचा आहे का? त्यामुळे असल्या चिथावणीखोर बोलणं तुमच्या तिकडे कोणालातरी ऐकवा, अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या बघितलेल्या आहेत, अशा कडक शब्दांत लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.