32.7 C
Latur
Thursday, February 20, 2025
Homeसंपादकीयपुन्हा पुन्हा चेंगराचेंगरी!

पुन्हा पुन्हा चेंगराचेंगरी!

महाकुंभसाठी प्रयागराजकडे जाणा-या दोन एक्स्प्रेस रेल्वे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर उशिराने आल्याने स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये १४ महिला व ४ बालकांचा समावेश आहे. नवी दिल्ली स्टेशनवरून प्रयागराजकडे जाणा-या दोन रेल्वे गाड्या शनिवारी रात्री उशिराने आल्या. त्या वेळी रेल्वे स्टेशनवर भाविकांची तुफान गर्दी झाली होती. त्यात अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाल्याने लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुस-या प्लॅटफॉर्मकडे पळत सुटल्याने चेगराचेंगरी झाली. रेल्वेने मृतांच्या कुटुंंबीयांना प्रत्येकी १० लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी अडीच लाख तर किरकोळ जखमींना १ लाखाची मदत जाहीर केली आहे. नेमकी चेंगराचेंगरी कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नसून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दर तासाला दीड हजार तिकिटांची विक्री झाल्याने गर्दी अचानक वाढल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी रात्री नवी दिल्लीहून प्रयागराजला ४ रेल्वे गाड्या जाणार होत्या.

त्यापैकी ३ गाड्या विलंबाने धावत होत्या त्यामुळे स्थानकावर गर्दी झाली होती. फलाट क्रमांक १४ वर प्रयागराज एक्स्प्रेस उभी असताना फलाट क्रमांक १६ वर प्रयागराज विशेष गाडीची घोषणा झाली त्यामुळे नेमकी आपली गाडी कोणती यावरून प्रवाशांचा गोंधळ उडाला. फलाट क्रमांक १४ व १५ ला जोडणारा जीना अरूंद होता. एकाच वेळी हजारो प्रवाशांनी जिन्याकडे धाव घेतल्यामुळे चेंगराचेंगरी झाली असावी, असा अंदाज आहे. गर्दीचा मोठा रेटा वाढल्याने काहींचा तोल गेला आणि ते आणखी काही लोकांना घेऊन कोसळले, असे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले आहे. लोक जीवाच्या आकांताने धावत होते. त्यांचे सामान, बुट-चप्पला सर्वत्र विखुरले होते. जमिनीवर फुटलेल्या बांगड्यांचा खच पडला होता. फलाट क्रमांकातील बदलाच्या उद्घोषणेमुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये उत्तर रेल्वे विभागाचे नरसिंह देव व उत्तर रेल्वेचे सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार यांचा समावेश आहे.

काही लोक पादचारी पुलावरून उतरताना घसरून एकमेकांवर पडल्याने चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे कारण उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी दिले आहे. रेल्वे गाडीचा फलाट क्रमांक अचानक बदलल्याने चेंगराचेंगरीचा दावा चुकीचा असल्याचे उपाध्याय म्हणाले. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडणे तसेच दर तासाला दीड हजार सामान्य श्रेणीतील तिकिटांची विक्री केल्यामुळे नवी दिल्ली स्थानकावर अनियंत्रित गर्दी झाल्याचे बोलले जात आहे. फलाट क्रमांक १४ वर प्रयागराज एक्स्प्रेस उभी होती. या ठिकाणी आधिपासूनच प्रवाशांनी गर्दी केली होती. त्याच वेळी प्रयागराज स्पेशल फलाट क्रमांक १६ वर येणार असल्याची उद्घोषणा झाली. प्रयागराज एक्स्प्रेस व प्रयागराज स्पेशल या दोन रेल्वे गाड्यांच्या नावातील साधर्म्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आपली गाडी सुटू नये म्हणून फलाट क्रमांक १४ वर पोहोचण्यासाठी प्रवाशांनी धाव घेतली.

प्रवाशांच्या पळापळीमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फिरत्या जिन्यावरून जाणारे काही जण पाय घसरून एकमेकांवर पडले आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. पळताना प्रवाशांनी इतर लोकांना तुडवत धावणे सुरूच ठेवल्याने जीवितहानी झाली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेली चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच नवी दिल्लीत रेल्वे स्टेशनवरही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलंी. दुर्घटनेनंतर घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना, मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा आदी सोपस्कार पार पडले; परंतु देशात अनेक ठिकाणी सातत्याने गर्दीच्या वेळी अशा प्रकारच्या चेंगराचेंगरीच्या घटना घडत असल्याने या घटना टाळण्यासाठी काय करता येईल, या बाबत कोणताही विचार केला जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन्यात आली असली तरी दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि अनियंत्रित गर्दीमुळे ही दुर्घटना घडल्याचे उघड आहे.

रेल्वे स्थानकाच्या प्रशासनाने गर्दीचा अंदाज आल्यावर काही फलटांवरील जिने ब्लॉक करून ठेवले होते त्यामुळे एकाच फलाटावर जाणा-या जिन्यावरील गर्दी वाढली आणि ही गर्दी अनावर झाल्यावर चेंगराचेंगरीला सुरुवात झाली असावी. खरे तर प्रशासनाला या गर्दीची कल्पना असायला हवी होती आणि दुसरे म्हणजे दोन महत्त्वांच्या रेल्वे उशिरा धावणार होत्या तर त्या फलाटावर कशासाठी उभ्या होत्या? त्या रेल्वेमधून जाणारे प्रवासीसुध्दा फलाटावर होते. स्थानकावर दुप्पट-तिप्पट गर्दी होणार याची कल्पना रेल्वे प्रशासनाला असूनही चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊ नये म्हणून कोणतीही पूर्व काळजी घेण्यात आली नाही हे उघड आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला असला तरी भारतातील गर्दीला बेशिस्तीचा जो शाप लागला आहे त्याकडेही बघण्याची गरज आहे. गर्दीचे मानसशास्त्र सांगते ते असे, प्रत्येकाला पुढे जायचे असते, पुढे जात असताना आपल्या पायाखाली कोण येत आहे याचा विचार केला जात नाही.

प्रत्येक जण पुढे जाण्याचा आणि आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. असे करण्यात काही जणांचा जीव जातो तर काही जणांचा वाचतो. आजवर चेंगराचेंगरीची शेकडो घटना घडल्या तरी गर्दीने अंगी शिस्त बाणवून घेतलेली नाही. त्यासाठी आता शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये गर्दीमध्ये कसे वागावे याबाबतचे धडे द्यावे लागणार आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणीसुध्दा प्रत्येकाने शिस्तीचे पालन केले तर बरेच काही साध्य होऊ शकते. कोणताही गोंधळ न होता परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. गोंधळाच्या परिस्थितीत कोणालाच काय करावे हे सूचत नाही हे खरे असले तरी आपण दुस-याच्या मृत्यूस कारणीभूत व्हायचे नाही याचे भान ठेवले तरी अशा दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात. ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या शर्यतीत सामील न होता डोके शांत ठेवल्यास बरेच काही साध्य होऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR