मुंबई : सध्या मनोरंजनविश्वात अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चा धुमाकूळ आहे. पुष्पा २: द रुल थिएटरमध्ये धडकला आहे. ठिकठिकाणी सिनेमा हाऊसफुल सुरु आहे. हिंदी प्रेक्षकही हा दाक्षिणात्य सिनेमा एन्जॉय करत आहेत. अर्थात आपल्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनेच यातही आवाज दिला आहे. नुकतेच श्रेयसने पुष्पाचे डबिंग करतानाचे एक सीक्रेट उघड केले.
२०२१ साली आलेल्या पुष्पा: द राईज सिनेमासाठी श्रेयस तळपदेने डबिंग केले होते. अल्लू अर्जुनसाठी त्याने दमदार आवाज दिला. त्याच्या आवाजाचे खूप कौतुक झाले. खुद्द अल्लू अर्जुननेही डबिंगचे कौतुक केले. यामुळे आता सीक्वेलसाठी डबिंग करताना श्रेयस थोडा नर्व्हस झाला होता. श्रेयस म्हणाला, माझ्या पोटात गोळा आला होता. थोडा नर्व्हस झालो होतो. कारण पुष्पाच्या पहिल्या पार्टसाठी डबिंग केले तेव्हा कोणताच दबाव नव्हता. एवढे कौतुक होईल हे कोणालाच माहित नव्हते. त्यामुळे यावेळी जरा दबाव वाटला. मला वाटले की मी जाईन आणि माझे काम करेन. अल्लू अर्जुननेच खरंतर कमाल केली आहे. मला फक्त त्याच्या मेहनतीला न्याय द्यायचा होता. सगळ्यांना माझे काम आवडले याचा मला आनंदच आहे.
तो पुढे म्हणाला, यावेळी अल्लूचा सिनेमातील स्वॅग आणखी जास्त होता. तो स्वॅग मला तसाच आवाजातूनही दाखवायचा होता. पहिल्या पार्टमध्ये तो उभरता होता. पण यामध्ये त्याला आत्मविश्वास आहे. तो राज्य करत आहे आणि मला ते आवाजातून आणायचे होते. त्याची बॉडीलँग्वेज आणि माझा आवाज जुळणे गरजेचे होते. मी राज्य करतोय ही बाब दाखवून द्यायची होते. खरे सांगायचे तर यावेळी मी मागच्या वेळेसपेक्षा जास्त वेळ घेतला. यावेळी मी प्रत्येकी २ तासांचे १४ सेशन केले. अतिशय बारकाईने काम केले.
जर एखादा सीन करुन मी खूश नसेल तर मी परत करायचो. एखाद्या वेळी असे व्हायचे की माझा आवाज सूट होत नाही. तेव्हा मी सरळ थांबायचो. मला काहीच तडजोड करायची नव्हती. आज प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्या सगळ्याचे चीज झाल्यासारखे वाटत आहे.
श्रेयस शेवटी म्हणाला, मी सिनेमात काहीतरी व्हॅल्यू अॅड केली याचा मला आनंद आहे. तसंच यावेळी पुष्पा सिनेमात एक तर मद्यपान करतोय, सिगारेट ओढतोय किंवा तंबाखू खाताना दिसत आहे. त्यामुळे तेव्हा त्याच्याशी माझा आवाज जुळणे थोडे कठीण होते. मग मी तोंडात कापूस ठेवायचो आणि डायलॉग म्हणायचो.