25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रपूजा खेडकरची चौकशी होणार

पूजा खेडकरची चौकशी होणार

समितीची स्थापना, २ आठवड्यांत अहवाल देण्याचा केंद्राचा आदेश
मुंबई : प्रतिनिधी
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. कारण आता पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांची आणि आतापर्यंतच्या वर्तनाची चौकशी केली जाणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला २ आठवड्यांत आपला अहवाल देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. यात पूजा खेडकर यांची यूपीएससीमध्ये झालेली निवड आणि इतर संबंधित बाबींची समिती सखोल चौकशी करणार आहे.

पूजा खेडकर या २०२२ सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यांनी २०१९ सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर २०२२ सालची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचे समोर आले. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचे समोर आले. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख रुपये इतके दाखवले होते. त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमीलेअरमधून सर्टिफिकेट कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली. परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. मात्र ज्या अंबर दिव्यावरुन त्या वादात सापडल्या, त्याची हौस काय संपल्याचे दिसत नाही. कारण गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होताना पूजा खेडकर अंबर दिवा असलेल्या सरकारी गाडीने कार्यालयात दाखल झाल्या. मात्र प्रसारमाध्यमात वृत्त दाखवताच त्यांच्या गाडीवरील अंबर दिवा हटवण्यात आला.

खोट्या अपंगत्वाचा दाखला
पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्या तरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली, याचा तपास केंद्र सरकारची समिती करणार आहे.

आईचा थयथयाट,
पोलिसांवरच अरेरावी
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्याने सर्वांनाच धक्का बसला. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्याने त्या अडचणीत आल्या. हे प्रकरण तापल्याने ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिस पोहोचले. पण बंगल्याचे गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढेच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली आणि चित्रिकरण बंद करा, असे म्हणत थयथयाट केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR