33.6 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रपोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ!

पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ!

बुलडाण्यात जगातील सर्वांत दुर्मिळ घटना

बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा येथे सरकारी रुग्णालयामध्ये नुकताच एक असा प्रकार घडला, ज्यामुळे आरोग्य यंत्रणाही हैराण झाली, डॉक्टरही चक्रावले. कारण बुलडाण्यात एका महिलेच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये गरोदर महिलेच्या गर्भात वाढणा-या बाळाच्याही पोटात एक बाळ असल्याचे सोनोग्राफीमध्ये दिसून आले. वैद्यकीय भाषेत अशा प्रकरणाला ‘फीट्स इन फिटु’असे म्हटले जाते.

दोन आठवड्यांपूर्वी बुलडाण्यातील मोताळा तालुक्यातील एका गावात ९ महिन्यांची गरोदर महिला (३२ वर्षे वय) सरकारी रुग्णालयात पोहोचली. येथे डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी महिलेची सोनोग्राफी केली आणि त्याचवेळी त्यांना काहीतरी संशयास्पद गोष्ट आढळली. महिलेच्या गर्भामध्ये एक बाळ दिसले, सोबतच या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ दिसले आणि हे दृश्य पाहून डॉक्टरही हैराण झाले.

जिल्ह्यातील घाटाखालील भागात राहणा-या या महिलेने नियमित तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले होते. सोनोग्राफी तपासणीदरम्यान डॉक्टरांना ही बाब लक्षात आली. सोनोग्राफी करणारे डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी सोनोग्राफीमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे स्पष्ट दिसून आले. ३५ आठवड्यांहून अधिकच्या या गर्भांमध्ये काही हाडे आणि गर्भासारखी रचना दिसून आली. ही घटना वैद्यकीय क्षेत्रात एक आश्चर्यकारक घटना मानली जात आहे. ‘फीटस् इन फीटू’ मध्ये एका जुळ्या भावाच्या किंवा बहिणीच्या शरीरात दुस-या जुळ्या भावाचा किंवा बहिणीचा अपूर्ण विकास होतो. ही स्थिती गर्भावस्थेतच निर्माण होते आणि दुसरा गर्भ पहिल्या गर्भाच्या शरीरात वाढतो.

महिलेला धोका नाही
डॉक्टर अग्रवाल यांनी तातडीने ही बाब वरिष्ठ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली आणि या महिलेच्या प्रसूतीसाठी तिला तातडीने छ. संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. या प्रकरणात महिलेच्या जीवाला कोणताही धोका नाही. पण, प्रसूतीनंतर बाळावर उपचार झाले नाहीत, तर मात्र त्याच्या वाढीत समस्या उद्भवू शकतील ही बाब स्पष्ट केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR