मुंबई : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करू दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल विचारत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावक-यांना मतपत्रिकेवर मतदान करू दिले नाही का?, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी दाखवली यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’
याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजप सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य नसल्याने सोलापूरमधील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान आयोजित केले होते. मात्र हे मतदान रोखण्यासाठी या गावात पोलिसांनी कलम १४४ लागू केले. यावरून पटोले यांनी ट्विट करत मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम ठोकला आहे.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. काँग्रेस पक्षानेही सातत्याने निवडणुकीतील गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या पण निवडणूक आयोग ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे झाले नाही. निवडणूक आयोग आता फक्त नावालाच स्वायत्त संस्था उरली असून आज ते भाजपच्या हाताखालचे कठपुतली बाहुले झाले आहे का? असा प्रश्न जनता विचारत आहे.
काँग्रेस मारकडवाडीच्या ग्रामस्थांसोबत
मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष या लढाईत मारकडवाडीच्या ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन हुकूमशाही हरेल व लोकशाहीचाच विजय होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
आयोगाने संधी गमावली
मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर प्रशासन एका छोट्या खेड्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला का घाबरत आहे? आपले बिंग फुटेल म्हणून? ईव्हीएमवरचे मतदान निर्दोष आहे, त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे’, असे नाना पटोले यांनी ट्विट केले आहे.