बीड : प्रतिनिधी
बीड तालुक्यातील घोडका राजुरीजवळ भरधाव एसटी बसने पोलिस भरतीची तयारी करणा-या ५ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. आज (१९ जाने.) सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
दरम्यान, बीडवरून परभणीकडे प्रवासी घेऊन जाणा-या बस क्रमांक एमएच-१४ बीटी १४०३ या बसने पोलिस भरतीची तयारी करणा-या तरुणांना उडवले. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले. मात्र, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
तिन्ही मृत तरुणांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०), विराट बब्रुवान घोडके (वय १९) आणि ओम सुग्रीव घोडके (वय २०) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर इतर दोघांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.