लातूर : प्रतिनिधी
एखाद्या जिल्ह्याचा पर्यायाने राज्याचा विकास त्या-त्या ठिकाणी असलेल्या उद्योग व्यवसायावर अवलंबून असतो. लहान-मोठ्या उद्योगामधून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन त्याआधारे त्यांच्या जीवनमान उंचावत असतो. पर्यायाने जिल्ह्याचा व राज्याचा विकास साध्य केला जातो. हीच बाब लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडी-अडचणी समजून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय सुरळीतपणे चालावे, त्यांना कोणतेही असमाजिक तत्व विनाकारण, नाहक त्रास देऊ नये. तसेच त्यांना निर्माण होणा-या अडीअडचणी, वाहतूक व्यवस्था त्यावरील उपाय योजना बाबत सखोल चर्चा करण्यात आली. एकंदरीत लातूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय, त्यांना घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करून निर्विघ्नपणे चलावे व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी पर्यायाने लातूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे. यासाठी उद्योजकांना निर्माण होणा-या अडीअडचणी तसेच तक्रारी सोडविण्याकरिता वन सिंगल कॉन्टॅक्ट पॉईंट तयार करण्यात आले असून त्याचे नोडल ऑफिसर म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामार्फत उद्योजकांच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेऊन उचीत कारवाई करण्यात येणार आहे. जेणेकरून उद्योजकांच्या अडीअडचणी वेळेत सोडविले जातील.
त्याशिवाय सध्या कार्यरत असलेल्या जुने एमआयडीसी परिसरातील पोलीस चौकी अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार असून तेथे आणखीन पोलीस अधिकारी व अमलदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच एमआयडीसी परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तसेच अतिरिक्त एमआयडीसीत सुद्धा पोलीस चौकी उभारण्याची मागणी उद्योजकांनी केली असून एमआयडीसीचे महाव्यवस्थापकानी पोलीस चौकीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. लातूर जिल्हा पोलीस दल यापूर्वीही उद्योजकांच्या पाठीशी होते आणि पुढेही उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून उद्योजकांना कोणीही बेकायदेशीर पणे त्रास दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले असून सदर बैठकीस उपस्थित उद्योजकांनीही पोलीस अधीक्षकांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
सदर बैठकीस पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, पोलीस उपाधीक्षक (गृह) गजानन भातलवंडे, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख, जिल्हा उद्योग केंद्र, लातूरचे महाव्यवस्थापक प्रवीण खाडे, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी लातूर, भांबरे तसेच लातूर जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.