24.8 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeमहाराष्ट्रप्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र

प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र

पूनम महाजन यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली. प्रमोद महाजन यांची हत्या गृहकलहामधूनच झाल्याची त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी वडिलांची हत्या ही कौटुंबिक विषय किंवा द्वेषभावनेपोटी नव्हती, असा दावा केला. ते एक मोठे षडयंत्र होते, असा दावा एका माध्यमाशी बोलताना केला.

माजी खासदार पूनम महाजन यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. पूनम महाजन यांनी म्हटले, माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हा हा कौटुंबिक विषय असल्याची चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची राजकीय कारकीर्द पुढे जाऊ नये, यासाठी षडयंत्र होते. त्यांना रोखण्यासाठी संपवण्यात आले. एवढेच नाहीतर माझे लोकसभेच्या वेळी तिकिटही कापण्यात आले. तेही एक मोठे षडयंत्र होते. पण हे षडयंत्र कोणी रचले? हे असे कोणी का केले? याच्या शोधात मी बसत नाही. मात्र, हे षडयंत्र आज नाही तर उद्या एक दिवस बाहेर येईल. मी माझ्या कामाला प्राधान्य देते असेही पूनम महाजन यांनी म्हटले आहे.

म्हणावी तशी चौकशी झाली नाही
पूनम महाजन यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे यावर बोलताना म्हणाले, पूनम महाजन यात षडयंत्र होतं असं म्हणत असतील तर, चौकशी झाली पाहिजे. त्यावेळी मी स्वत: प्रमोद महाजन यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळीही त्यांची हत्या कौटुंबिक वादातून झाली, अशी मोठी चर्चा होती. त्यावेळी चौकशी झाली. पण चौकशीतून काही बाहेर आले नाही.

पुरावे सादर करावे : मुनगंटीवार
जर पूनम महाजनांकडे काही पुरावे किंवा तशी कागदपत्रं असतील तर त्यांनी ती सरकारला द्यावीत. सरकार त्याची नक्कीच चौकशी करेल. याच्यात कोणी जर दोषी असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR