वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
प्रिन्स चार्ल्स व लेडी डायना यांचे पुत्र प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेघन मार्कल यांच्याविषयी अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य आणि त्यामुळे सुरू झालेला वाद सध्या चर्चेत आहे. प्रिन्स हॅरीला अमेरिकेने अद्याप व्हिसा दिलेला नाही. तरीही त्याला बेकायदा स्थलांतरित लोकांप्रमाणे ब्रिटनला पाठवणार नाही. ‘तो गरीब बिचारा आहे. त्याची पत्नी मात्र भयंकर आहे’, असे ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेघन मार्कल यांनी राजघराण्याचा त्याग करून सामान्यांप्रमाणे जगण्याचा निर्णय घेतला. मेघन मार्कल ही हॉलिवूडमधील अभिनेत्री. ती अमेरिकन. तिची आई आफ्रिकन व वडील अमेरिकन. ती मिश्र वंशाची असल्याने ब्रिटनच्या राजघराण्यात नाराजी व्यक्त झाली होती. एवढेच नव्हे, तर राजघराण्यातील मंडळींचे या दाम्पत्याशी संबंध बिघडले वा संपले होते. त्यामुळे हे दोघे मुलांसह ब्रिटन सोडून कॅनडामध्ये गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी राजघराण्यावर अनेक आरोप केले होते. त्यांचे राहण्याचे ठिकाण सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवले होते; पण कोविडच्या काळात फोटोग्राफर्सना त्यांचा सुगावा लागला आणि ते अमेरिकेत राहायला आले.
मेघन मार्कल अमेरिकनच आहे; पण प्रिन्स हॅरी ब्रिटनचे नागरिक, शिवाय राजघराण्याशी संबंधित. मात्र, त्यांना अमेरिकेने अद्याप व्हिसा दिलेला नाही. तरीही ते तिथे राहत आहेत. प्रिन्स हॅरी व मेघन मार्कल, हे दोघे डोनाल्ड ट्रम्पचे टीकाकार. मेघन मार्कल यांनी तर ट्रम्प यांच्यावर कडक शब्दांत टीकाही केली होती; पण ट्रम्प तिला काहीच करू शकत नाहीत. बेकायदा वास्तव्य करणा-या प्रिन्स हॅरीला मात्र व्हिसा नसल्याने परत पाठवण्याचा निर्णय होऊ शकतो.