लातूर : प्रतिनिधी
‘आता माझे लग्ग्र झाले आहे, यापुढे मला बोलत जाऊ नकोस, फोनही करू नकोस, माझा नवरा मला मारहाण करतो, असे प्रेयसीने तिच्या जुन्या प्रियकराला सांगितले’, त्यावर प्रेयसीला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी जुन्या प्रियकराने, त्याच्या एका साथीदाराने प्रेयसीच्या पतीचा दोरीने गळा आवळून खून केला. प्रेत रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात टाकले. ही घटना बुधवारी दि.६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच तपासाची चक्रे गतिमान करून खुनातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अजय नामदेव चव्हाण वय २५, रा. आलमला तांडा, ता. औसा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेतील मयत अजय याचा विवाह आलमला तांडा येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या लातूर तालुक्यातील चिंचोलीराव तांडा येथील एका मुलीशी झाला होता. लग्नापूर्वी मयत अजय चव्हाण याची पत्नी व आरोपी अनिल गोविंद जाधव रा. चिंचोलीराव तांडा, ता. लातूर यांचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी मयत अजय चव्हाणचा विवाह चिंचोलीराव तांडा येथील सदर तरुणीशी झाला होता. विवाहानंतर अजय व त्याची पत्नी दोघेही सुखाने संसार करीत होते. परंतु, आरोपी अमोल गोविंद जाधव हा प्रेयसीला भेटण्याचा आग्रह करीत होता. कधीकधी तो विवाहितेच्या घरीही जात असे. हे मयत अजय चव्हाण याला समजल्यानंतर तो त्याच्या पत्नीला मारहाण करीत असे. यामुळे हा वाद सारखाच नको म्हणून मयताच्या पत्नीने आरोपी अनिल जाधव याला भेटून, ‘यापुढे भेटू नकोस, फोनही करू नको नकोस, झाले गेले विसरून जा, असे सांगून ‘तुला भेटल्याचे समजल्यानंतर माझे पती मला मारहाण करतात’, असे सांगितले.
यावर चिडलेल्या आरोपी अनिल जाधव याने माझ्या प्रेयसीला मारहाण होत असल्याचा राग त्याला अनावर झाला. बुधवारी दि.६ रात्री दहा वाजेच्या सुमारास आरोपी अनिल जाधव याने त्याचा साथीदार सुशील संतोष पवार दोघेही रा.चिंचोलीराव तांडा, ता. लातूर हे मयत अजय चव्हाण याला चिंचोलीराव-गंगापूर रस्त्यावर घेऊन आले. तेथे दोघांनी मिळून अजय चव्हाण याचा गळा आवळून निघृण खून केला. प्रेत रस्त्याच्या कडेच्या खड्डयात टाकून देण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी मयताची ओळख पटविली. मयत अजय याच्या कुटुंबीयांना कल्पना देण्यात आली. मयताच्या आईच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.