वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
प्लूटोला एकेकाळी आपल्या ग्रह मालिकेत स्थान होते; पण काही वर्षांपूर्वी खगोलशास्त्रज्ञांनी त्याला ‘ड्वॉर्फ प्लॅनेट’ म्हणजेच खुजा ग्रह ठरवून ग्रहमालिकेच्या बाहेर काढले. प्लूटो हा आपल्या सौरमालिकेच्या टोकावर असलेल्या क्युपर बेल्ट नावाच्या पट्ट्यात आहे. सूर्यापासून अतिशय दूर असलेल्या याठिकाणी त्याच्यासारखे अनेक बर्फाळ खगोल आहेत. प्लूटोला पाच चंद्र आहेत. त्यापैकी त्याच्या सर्वात जवळ असलेला चंद्र म्हणजे शेरॉन. शेरॉनचा आकार प्लूटोच्या निम्मा आहे. एका नव्या संशोधनात असे दिसून आले आहे की, अब्जावधी वर्षांपूर्वी प्लूटोची या चंद्राबरोबर टक्कर झाली होती.
हे दोन्ही खगोल काही काळ एकमेकांच्या शेजारी राहून एखाद्या ‘कॉस्मिक स्रोमॅन’सारखे फिरत होते. तुलनेने लवकरच ते एकमेकांपासून दूरही झाले; मात्र सध्याच्या प्लूटो-शेरॉन कक्षेच्या माध्यमातून एकमेकांशी निगडीत राहिले. एखाद्या चंद्राला स्वत:कडे ओढून घेणे व अवकाशीय धडक याबाबतच्या घटनांवर नवा प्रकाश टाकणारे हे नवे संशोधन आहे. तसेच, क्युपर बेल्टमधील बर्फाळ खगोलांची संरचना समजून घेण्यासाठीही ते उपयुक्त ठरेल. ऍरिझोना युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रज्ञ ऍडीनी डेंटन यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी सांगितले की, प्लूटोने एकेकाळी निश्चितपणे आपल्या प्रभावाने शेरॉनला ओढून घेतले होते.
अनेक अवकाशीय धडकेच्या घटना या ‘हिट अँड रन’ सारख्या असतात. ‘गेझ अँड मर्ज’ यासारख्याही काही घटना असतात. काही काळ असे खगोल एकत्रही राहून मग पुन्हा वेगळे होतात. प्लूटो आणि शेरॉनबाबत असेच घडले होते. ते तात्पुरत्या स्वरुपात एकत्र आले होते, एकमेकांना चिकटलेही होते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.