मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आज (बुधवारी) भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे फडणवीस यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे. फडणवीसांच्या या इच्छेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, यश-अपयश सामूहिक जबाबदारी असते.
निवडणुकीत हार-जीत होत असते. आता जी निवडणूक झाली त्यामध्ये त्यांना जागा जास्त मिळाल्या तरी मतांची टक्केवारी सारखीच आहे. मुंबईत तर दोन लाख मते आम्हाला जास्त आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे. या निवडणुकीत आलेले यश-अपयश ही सामूहिक जबाबदारी आहे, असे आम्ही समजतो. आम्ही एक टीम म्हणून काम केले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीसांनी आणि आम्ही चांगले काम केले आहे. पुढेही आम्ही सोबत चांगलं काम करू, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
एका निवडणुकीने सगळे काही संपत नाही. एका निवडणुकीत हार-जीत झाली. त्यामुळे आम्ही खचून जाणारे नाही. फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या असतील. मात्र, आम्ही एक टीम म्हणून काम करत राहणार आहे. पुढे श्ािंदे म्हणाले, मी याबाबत देवेंद्र फडणवीसांशी बोलणार आहे. ही जबाबदारी आमची सर्वांची आहे. ही कोणाचीही एकट्याची जबाबदारी नाही, असेही पुढे शिंदे म्हणाले.
फडणवीस सरकार, संघटनेत हवेत
देवेंद्र फडणवीस यांनी आपली इच्छा व्यक्त केली. पण, आम्हाला ते सरकारमध्ये आणि संघटनेमध्ये देखील हवे आहेत. त्यांनी दु:खातून ही भावना व्यक्त केली आहे. केंद्रासोबत मी याबाबत बोलणार आहेच. सरकारच्या बाहेर जाऊन नाही तर सरकारच्या मध्येच राहून त्यांनी काम करावे अशी आमची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
भाजप नेत्यांनी फडणवीसांशी चर्चा करून आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करुन लगेच दुसरी पत्रकार परिषद घेतली. यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांची भूमिका स्पष्ट केली. कोअर समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे, त्यांनी सरकारमधून बाहेर राहुन काम करण्याची गरज नाही. त्यांना आम्ही विनंती केली आहे की, सरकार आणि संघटनेमध्ये समन्वय ठेवून त्यांनी काम करावं, असे बावनकुळे म्हणाले.