23.7 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांच्या ‘व्होट जिहाद’वर काँग्रेस आक्रमक

फडणवीसांच्या ‘व्होट जिहाद’वर काँग्रेस आक्रमक

मुंबई : कोल्हापूर इथल्या एका कार्यक्रमात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा उल्लेख करत एका धर्माविषयी भूमिका स्पष्ट केली. यावर काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी फडणवीस यांची भाषा अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका केली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या मतांचा अवमान फडणवीसांनी केला असून, संविधानाची शपथ विसरलात, त्याची आठवण सचिन सावंत यांनी करून दिली.

सचिन सावंत यांनी व्हीडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीस यांनी ‘वोट जिहाद’ शब्द वापरून संविधानाचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संविधानिक पदावर आहेत. त्यांनी असा शब्दप्रयोग करणे हे दुर्दैवी आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून प्रत्येकाला मतांचा अधिकार दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विधान म्हणजे, तो या अधिकाराचा अवमान आहे. संविधानाचा अवमान आहे. देवेंद्र फडणवीस संविधानिकपदावर आहेत. त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. त्यांनी संविधानाच्या शपथेचा भंग केला आहे, असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

राणे, रामगिरींना पाठिशी घालू नका
मुस्लिम समाज भाजपला का मतदान करत नाही, याची चिंता करायला हवी. तुम्ही मुस्लिमांविषयी द्वेष पसरविणारे रामगिरी महाराज आणि आमदार नितेश राणे यांना पाठिशी घालता, आणि दुस-या ठिकाणी मुस्लिम सणानिमित्ताने दोन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा करता, हा विरोधाभास भाजपच्या कार्यपद्धतीत दिसतो, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला.

फडणवीसांना शपथेची आठवण करून दिली
मुस्लिम मते पाहिजे असतील तर रामगिरी महाराज आणि आमदार नितेश राणे यांना पाठिशी घालणे सोडून द्या. त्यांच्याविरोधात कारवाई करा. धार्मिक द्वेष पसरविणा-या व्यक्तीला गजाआड करण्याची हिंमत बाळगा. हे जर होत नसेल तर थयथयाट करणे योग्य नाही. तुम्ही कितीही संविधानाची मंदिरे उभारली, तरी संविधान स्वत:च्या जीवनाचा भाग न बनविल्यास काही होणार नाही, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदावेळी घेतलेल्या शपथेची आठवण सचिन सावंत यांनी करून दिली.

‘वोट जिहाद’वर फडणवीसांचे भाष्य
कोल्हापूर इथल्या कार्यक्रमात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वोट जिहाद’वर विधान केले. देशात पुन्हा एकदा सांस्कृतिक पुनरुत्थान होत आहे. हे अनेकांना पाहवत नाही. त्यामुळे हिंदूविरोधकांनी हिंदूविरोधी जागतिक वातावरण तयार करण्याचे षडयंत्र रचले आहे. ‘लव्ह जिहाद’ पाठोपाठ ‘वोट जिहाद’चे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले. त्यामुळे संत शक्तीने हिंदूविरोधकांचा मुकाबला करण्यासाठी पाठबळ द्यावे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR