वडीगोद्री (जालना) : धनगर आणि मराठा या दोन्ही जाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपवल्या, आता फडणवीस हे संपवासंपवी खात्याचे मंत्री असायला हवेत. त्यांनी सगळ्यांचा कार्यक्रम केला, अशी खरमरीत टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केली.
पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आल्यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यादरम्यान ते बोलत होते. जरांगे पुढे म्हणाले, आरक्षण द्यायला बारा महिने लागत नाहीत. देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळांच्या नादात सत्ता घालवून बसणार. आम्ही पूर्ण तयारीला लागलो आहोत. पाडायचे की लढायचे आम्ही ठरवू पण तुमचा कार्यक्रम लावणार, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला. मराठ्यांना लढावं लागणार हे लक्षात घेतलं.
चांगल्या संख्येने मराठा समाज एक येत आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १४ ते २० ऑगस्टपर्यंत होणार आहेत. राज्यातल्या सगळ्या मतदारसंघातील सर्व जाती-धर्मातील लोकांनी डाटा घेऊन येणे आवश्यक आहे. कोणत्याही जातीचा असो, ज्यांना ज्यांना वाटतं की गोरगरिबांची सत्ता आली पाहिजे, त्यांनी यावं असे आवाहन जरांगे यांनी केले.
आजपासून २९ तारखेपर्यंत सरकारला पुन्हा वेळ दिला. आम्हीच दिला मनाने. आजपर्यंतचे सरसकट गुन्हे मागे घ्यावे लागणार आहेत. तुमचा खुर्चीत जीव आहे, आमचा आरक्षणात जीव आहे. त्यामुळे राजकीय भाषा वापरावीच लागेल ना.
लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ
आता समाज पहिल्यासारखा भोळा राहिलेला नाही. योजना द्यावी पण आता शंका येत आहे. कारण मतदान केलं तर बरं अन्यथा पैसे परत घेऊ, असे कुणीतरी बोलले आहे. हा मतदान विकत घेतल्यासारखा खेळ आहे. ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे.