मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी अर्जांची छाननी झाल्यानंतर आता प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचारावेळी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसतील. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र व मुंबईचे लचके तोडणा-या फडणवीस आणि त्यांच्या गुजराती कंपूचा पराभव करण्याचे जनतेने ठरवले असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपाचा महाराष्ट्रद्वेष अनेकदा दिसून आला आहे. आता महाराष्ट्र आणि मुंबईचे लचके तोडण्यात येत आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्रविरोधी पक्षांना मदत करणे हेच भाजपचे राष्ट्रीय धोरण आहे. त्यामुळे लोकसभेत फडणवीस आणि त्यांच्या कंपूचा पराभव करायचा, हे जनतेने ठरवले होते आणि त्यांनी ते करून दाखवले. आता विधानसभेलाही जनतेने फडणवीस आणि कंपूचा पराभव करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. हे सर्व जनभावनेमुळे होत असते.
लोकशाहीत जनभावना महत्त्वाची असते. महाराष्ट्र आणि मुंबईचे लचके तोडणा-या फडणवीस आणि त्यांच्या गुजराती कंपूचा पराभव करण्याचे जनतेने ठरवले आहे. हाच आमच्या मराठी जनतेचा आत्मविश्वास आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेणा नदीत पोलिसांना ८०० आधार कार्ड सापडले आहेत. याप्रकरणी संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेची मते कापण्यासाठी उभे असणा-या उमेदवारांना मदत करण्याचे आणि महाराष्ट्रविरोधी पक्षांना मदत करण्याचे भाजपाचे राष्ट्रीय धोरण आहे. बोगस आधार कार्डद्वारे बोगस नावे मतदारयादीत घुसवत बोगस मतदान करण्याचा उपक्रम भाजपाने राबवला आहे, हे अत्यंत गंभीर आहे. याची तक्रार आम्ही वारंवार केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
निवडणुका जाहीर होण्याआधी महायुतीच्या आमदारांकडे १५ ते २० कोटी रुपये आधीच पोलिस बंदोबस्तात पोहोचले आहेत. हेलिकॉप्टरनेही पैसे पोहोचवण्यात आले आहेत. त्यामुळे आता जे पकडण्यात येत आहे, ती किरकोळ रक्कम आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.