लातूर : प्रतिनिधी
माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादाला लागलात. ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. बेमुदत उपोषण काय असते हे पाहायचे असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या शेजारी बसून उपोषण करून पाहावे. त्यांची पोट आणि पाट एक झाल्याशिवाय राहणार नाही. सलाईन लावायला हाताची नस सुध्दा सापडणार नाही,एवढेच नाहीतर ते राज्याला लागलेला एक कलंक आहत्ो असा टोलाही जरांगे पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे.
लातूरात बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणा संवाद बैठकीच्या माध्यमाधून लातूरातील समाज बांधवाशी संवाद साधला यावेळी पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकला आणि मराठ्यांंना दहा टक्के आरक्षण जाहीर केले. पण ते टिकणारे नसल्याचे सांगून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही,’ असा इशारा देत त्यांनी आतापर्यंत ५७ लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या. सव्वा करोड मराठ्यांना प्रमाणपत्र प्राप्त होणार आहेत. राहिलेल्या समाजाचे काय? म्हणून सरकारने ओबीसीतून आरक्षण देण्याचे ठरवले, अधिसूचनाही काढली. आपली मागणी नवी नाही, ओबीसीमधून आरक्षण ही जुनीच मागणी आहे. २०१८ मध्ये १३ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले होते, ते आता १० टक्के केले आहे हे कितपत योग्य आहे असा सवाल सरकारला केला.
आज मराठा समाजातील लोकप्रतिनिधींना जातीपेक्षा पक्ष महत्त्वाचा वाटत आहे, म्हणून समाजाने डोळयासमोर आपल्या मुलांचे भविष्य ठेवावे, राजकारण ठेवू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केले.समाजाची झालेली एकजूट फुटू देवू नका, लवकरच सहा ते सात कोटी लोकांची मोठी सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी काय चूक होती की माझ्या विरोधात एस.आय.टी. स्थापन करून चौकशी लावली आहे. हजारो कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करणा-याची चौकशी लावली जाते. माझ्या घरावर तर पत्रे आहेत. मग माझ्या चौकशीचे आदेश का दिले, असा सवाल ही जरांगे पाटलांनी सरकारला विचारला तसेच मी बोललो की नाही माहीत नाही पण तुमची आई बहिण मग आमच्या आई बहिणी नाहीत का त्यांच्यावर अन्याय केला नाही का असा सवाल करीत जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समाजाला आरक्षण देजील अशी आशा होती पण त्यांनी ही कार्यक्रम करतोच असे ठासून सांगितले पण आता समाज त्यांचा कार्यक्रम करेल असे सुतोवाच या प्रसंगी केले. या संवाद बैठकीसाठी लातूरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.