बदलापूर : प्रतिनिधी
बदलापूर येथे एका नामवंत शाळेत दोन मुलींवर शाळेतील एका सफाई कर्मचा-याने लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेमुळे बदलापूर हादरून गेले होते. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला या प्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली असून, या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. दरम्यान आरोपी अक्षय शिंदेने डॉक्टरांपुढे वैद्यकीय तपासणी दरम्यान, त्याने मुलींवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. याचा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
बदलापूरमधील एका शाळेत शिकणा-या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले होते. ही घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. ही घटना घडल्यानंतर पालक याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यास गेले होते. तसेच शाळा प्रशासनावर देखील कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यांनी तक्रार नोंदण्यास टाळाटाळ केली आणि पालकांना बसवून ठेवल्याने दुस-या दिवशी बदलापूर येथे पालकांनी शाळेसमोर आंदोलन सुरू केले होते. यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर संतप्त नागरिकांनी या घटनेविरोधात जोरदार आंदोलन करत आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली होती. या वेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी एसआयटीचा तपास पूर्ण झाला आहे.
चौकशी समितीने २० जणांची घेतली साक्ष
पोलिसांनी शाळेतील सफाई कर्मचारी व आरोपी अक्षय शिंदे याला या प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करताना आरोपी अक्षय शिंदेने त्याने मुलींवर अत्याचार केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी ही बाब आरोपपत्रात मांडली आहे. डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी यांच्यासह २० जणांची चौकशी समितीने साक्ष घेतली आहे. तसेच विशेष न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात अक्षय शिंदेने डॉक्टरांसमोर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.